पुणे – अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मिरवणूक होत आहे, त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांसह शहरात येणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) बस मार्गासह थांब्यामध्येही बदल करण्यात आले आहेत तरी प्रवाशांना बदलेल्या स्थानकावरून बस उपलब्ध होईल, असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
स्वारगेट, सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, शिवाजीनगर या ठिकाणाहून शहरात येणारे रस्ते गुरूवारी (दि. 28) पहाटेपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येतात. त्यामुळे स्वारगेट, नळस्टॉप चौक, शिवाजीनगर (संचेती चौक) याठिकाणी रस्ते बंद करून वाहतूक वळविण्यात येते.
त्यानुसार स्वारगेट येथील शाहू महाराज स्थानक, नटराज बसस्थानक, स्वारगेट स्थानकाबाहेरील मूळ बसस्थानकात बदल करण्यात आले असून हे स्थानक तात्पुरत्या स्वरूपात लक्ष्मी नारायण चौक, पर्वती पायथा (स्वामी समर्थ मठ), वेगा सेंटर याठिकाणी असतील.
येथून सातारा रोडने कात्रज, मार्केटयार्ड, सिंहगड रोड, सोलापूर रोड, पुलगेट, हडपसर तसेच भवानी पेठ, नाना पेठ, रास्ता पेठकडे जाता येणार आहे.
कोथरूड, वारजेकडून येणाऱ्या बससेवा नळस्टॉपपर्यंत असेल तर काही मार्गावरील बस येथून वळविण्यात आले आहे.
तर शिवाजीनगर, पुणे स्टेशन या बाजूची बससेवा ही वळविण्यात आली आहे. संचलनात असलेल्या बसेसच्या मार्गामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहे, असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पीएमपी सेवा 24 तास…
प्रवाशांची गैरसोय होऊ नये, तत्काळ सेवा मिळावी यासाठी पीएमपी प्रशासनाकडून नियमित संचलनासह रात्रीही सेवा सुरू ठेवली आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीला 24 तास बससेवा उपलब्ध असणार आहे. यासाठी 672 जादा बस मार्गावर सोडण्यात आल्या आहेत. बसस्टॉपवर आलेल्या प्रवाशांना तत्काळ सेवा देण्याच्या सूचना सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
उपनगरांतही सेवा…
उपनगरांतील पीएमपी डेपोतूनही प्रवाशांसाठी विशेष बससेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. कात्रज, हडपसर, कोथरूड डेपातून याचे नियोजन करण्यात आले असून नेहमीच्या सर्व मार्गांवर सेवा कायम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.