शहरातील उद्याने, जॉगिंग ट्रॅक 15 दिवस बंद

नगर – करोना आजार हा संसर्ग जन्य आजार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांनमध्ये संसर्ग होवू शकतो; यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. मनपा प्रशासनाने येत्या 15 दिवस कठोर निर्णय घ्यावेत. समाजामध्ये जनजागृतीसाठी विविध उपाय योजना कराव्यात. तसेच शहरातील उद्याने, हॉटेल, धार्मिक स्थळे, व शहरातील विविध ठिकाणी असणाऱ्या चौपाट्या, जॉगिंग ट्रॅक, मंगल कार्यालय, शॉपिंग कॉम्प्लेक्स, या ठिकाणी मोठया प्रमाणात नागरिक एकत्र येत असल्याने ते तात्काळ बंद करण्याचे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिले.
मनपा हद्दीत व उपनगरामध्ये करोना विषाणू बाबत उपाय योजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी महापौर वाकळे यांनी नुकतीच अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी नूतन आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपमहापौर मालनताई ढोणे, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती लता शेळके, उपसभापती सुवर्णा गेणप्पा, उपायुक्त सुनिल पवार, डॉ.प्रदीप पठारे, नगरसेवक भैय्या गंधे, मनोज कोतकर, राहुल कांबळे, संजय ढोणे, अजय चितळे, अजिंक्य बोरकर, आरोग्याधिकारी डॉ.अनिल बोरगे, वैद्यकिय उपआरोग्याधिकारी डॉ.राजूरकर, डॉ.शंकर शेडाळे, डॉ.कविता माने, डॉ.आरती डापसे, डॉ.अश्विनी मरकड, डॉ.आएशा शेख, मुख्य स्वच्छता निरिक्षक राजकुमार सारसर, एस.टी.महामंडळ तारकपूर आगाराचे अविनाश कल्हापुरे, शहर बस सेवा व्यवस्थापक रावसाहेब काकडे आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर वाकळे यांनी आरोग्याधिकारी डॉ.बोरगे यांचेकडून करोना बाबत माहिती घेतली असता शिंकणे, खोकणे, यावाटे हवेमार्फत या विषाणूचा प्रसार होतो. करोना विषाणू हा प्राणिजन्य आजार आहे. नगर शहर व उपनगरातील नागरिकांनी स्वत: सुरक्षित राहण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी उपाय योजना करणे आवश्यक आहे.
नागरिकांनी वारंवार हात धुवावेत. तसेच शिंकणे व कोरडा खोकला आपले तोंड व नाक टिशू पेपर किंवा रूमालाने पुसावेत. कच्चे मास खाऊ नये, फळे व भाज्या न धुता खाऊ नयेत. नागरिकांना ताप खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर स्वत:हून कोणताही उपचार करू नये; डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत व मनपा आरोग्या केंद्राशी संपर्क करावा. जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.





