पिंपरी (प्रभात वृत्तसेवा) – पिंपरी-चिंचवड शहरातील करोना प्रसाराचा वाढता धोका लक्षात घेता हा प्रसार आता कम्युनिटी ट्रान्सफरच्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. दि. 19 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी केली जाईल, असे महापालिका आयुक्त श्रावण हार्डिकर यांनी जाहीर केले आहे. हे आदेश दि. 27 एप्रिलपर्यंत आदेश लागू असतील.
या आदेशानुसार, पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्व सीमा सील करण्यात येत आहेत. शहरातून बाहेर पडणारे सर्व रस्ते बंद करण्यात आल्याने बाहेरील व्यक्तीलाही या भागात प्रवेशबंदी असणार आहे.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार, दि. 20 एप्रिलनंतर देशाच्या काही भागातील लॉकडाऊन निर्बंध शिथील करण्यात आले होते. त्यातून पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील विविध आस्थापनांना आणि उद्योगांना सवलती उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणी नागरिकांचा वावर वाढून रुग्णांची संख्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, हा धोका लक्षात घेऊन ही उपाययोजना लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने दि.17 एप्रिल रोजी जो आदेश जारी केला, त्यात करोनाचा उद्रेक झालेल्या भागात कंटेनमेंट झोन निश्चित करण्याचा अधिकार पालिका आयुक्तांना देण्यात आला आहे. या अधिकाराअंतर्गंत आयुक्तांनी रविवारी रात्री ही नवीन उपाययोजना जारी केली.
– नवीन आदेशानुसार आता प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व बॅंक शाखा सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेतच सुरू राहतील.
– याच काळात म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 2 वेळेत दूध, भाजीपाला, फळे यांची किरकोळ विक्री सुरू राहील.
– मटण, चिकन, मासे यांची किरकोळ विक्रीही महापालिकेच्या पूर्वीच्या आदेशानुसार सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहील.
– अन्नधान्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची विक्रीही सकाळी 10 ते दुपारी 2 वेळेतच सुरू राहील.
– जीवनावश्यक वस्तू, औषधे आणि तयार अन्नपदार्थांचे घरपोच वाटप सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेतच मनपाच्या पूर्वमान्यतेने पास घेऊनच करता येईल.
– अत्यावश्यक सेवेसाठी यापूर्वी पोलिसांमार्फत देण्यात आलेले पास दि. 22 एप्रिलपर्यंतच लागू राहतील. त्यानंतर मनपामार्फत नव्याने पास घेणे सर्वांना बंधनकारक राहील.
– मोशी उपबाजार समितीतील व्यवहारांना मात्र सदरच्या आदेशातून वगळण्यात आले आहे.