नगर | पारनेरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांची मोटरसायकल रॅली

पारनेर – हिंदुत्ववादी विचारधारा जागृत ठेवण्यासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने पारनेर तालुक्यातील वाळवणे ते पारनेर यादरम्यान ५०० हून अधिक मोटरसायकलची शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली.
दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी पवित्र श्रावण मासानिमित हिंदवी विचारधारा आयोजित हिंदू एकता रॅली व मेळावा अतिशय जल्लोषात पार पडला. हिंदवी विचारधारेच्यावतीने हिंदू एकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. श्रावण महिन्यानिमित्त भैरवनाथ मंदिर वाळवणे या ठिकाणी महादेवाचा अभिषेक करून हिंदू एकता रॅलीस सुरुवात झाली.
या रॅलीमध्ये ५०० हून अधिक मोटरसायकल घेऊन हिंदू युवक सहभागी झाले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत सुपा- हंगा या मार्गी रॅली पारनेर शहरामध्ये दाखल झाली. गणेश मंगल कार्यालय, पारनेर या ठिकाणी रॅलीची सांगता झाली. हिंदुत्ववादी विचारसरणीच्या गीतांजली झेंडे यांचे शिव शंभू चरित्रावर व्याख्यान सादर करण्यात आले. हंगा गावातील सॉफ्टवेअर इंजिनिअर गौरव शिंदे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. मोठ्या संख्येने पारनेर तालुक्यातील सकल हिंदू युवक उपस्थित होता.





