नगर | प्रमाणपत्रासाठी झेडपीत बांधकाम कामगारांचे धरणे; टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी

नगर – आदेश देऊनही बांधकाम कामगारांना ग्रामसेवकांकडून प्रमाणपत्र दिले जात नसल्याच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्हा इमारत व इतर बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि.२) रोजी जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन करण्यात आले. प्रमाणपत्र मिळण्यासाठी बांधकाम कामगारांनी दिलेल्या घोषणांनी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला.
बांधकाम कामगार संघटनेचे सरचिटणीस नंदू डहाणे, क्रांती असंघटीत कामगार संघटनेच्या अध्यक्षा अनिता कोंडा, समर्पण फाऊंडेशनचे डॉ. किरण घुले व विश्वकर्मा बांधकाम कामगार संघटनेचे श्रीराम परदेशी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील बांधकाम कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बांधकाम कामगारांच्या नोंदणीचे नूतनीकरण होण्यासाठी ९० दिवसाचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने ग्रामसेवकांच्या आडमुठेपणामुळे बांधकाम कामगारांना शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
बांधकाम कामगारांना काही ग्रामसेवक प्रमाणपत्र देत नाही. ग्रामसेवक संघटनेच्या पत्रावर शासनाचे मार्गदर्शन येईपर्यंत प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही चालू ठेवावी, असे स्पष्ट आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहे. तरी देखील काही ग्रामसेवक बांधकाम कामगारांना९० दिवसाचे प्रमाणपत्र देण्याचे नाकारत आहे.
नगर तालुक्यातील नारायण डोह, चास, बुऱ्हाणनगर, मेहेकरी, निंबळक, नेवासा तालुक्यातील राहुरी ब्राह्मणी, आरडगाव, राहुरी खुर्द, केंदळ, अकोले तालुक्यातील अभोल, कोतुळ, मवेशी, राजुर, पाथर्डी तालुक्यातील अंबिकानगर, टाकळीमानुर, तीनखडी येथील ग्रामपंचायतीत ग्रामसेवक प्रमाणपत्र देत नाही. बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र नाकारणाऱ्या ग्रामसेवकांची प्रत्येक तालुकास्तरावर यादी करुन त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.





