अढगावात घरफोडी करणार्या महिलेस अटक

नगर – श्रीगोंदा तालुक्यातील आढगावात घरफोडी करणार्या महिलेच श्रीगोंदा पोलिसांनी १२ तासात ताब्यात घेतले असून तिच्याकडून ४ लाख ८९ हजार ८३३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला सोमवार (दि.२८) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिरा शांताराम काळे (रा. काळे वस्ती, आढळगाव ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सुभद्रा बापुराव शिंदे (वय ६५, रा. आढळगाव ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात चोरीची अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली होती.
याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा मिरा काळे यानी केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने महिलेचा शोध घेत मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचवून महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून चोरी केलेला ४ लाख ८९ हजार ८३३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे,आप्पासाहेब तरटे, गोकुळ इंगवले, संदिप राऊत, सचिन वारे, संदिप आजबे, संदिप शिरसाठ, आनंद मैड, महिला कर्मचारी आस्मिता शेळके यांच्या पथकाने केली.





