प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे महानगरपालिका आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या अंदाजपत्रकासाठी नागरिकांनाही थेट कामे सुचविता येणार आहेत. त्यासाठी, महापालिकेकडून दरवर्षी क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमांतून प्रस्ताव मागविण्यात येतात. या वर्षासाठी १ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२५ या कालावधीत या अंदाजपत्रकासाठी कामे सुचवित येणार आहेत. जनवाणी संस्थेच्या पुढाकारातून महापालिकेकडून २००६-०७ पासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, त्याला शहरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.या वर्षी महापालिकेकडून नागरिकांना कामे सुचविण्यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नसल्याने पालिकेच्या २०२१ मध्ये केलेल्या तीन सदस्यांच्या प्रभाग रचनेनुसार ही कामे प्रस्तावित केली जाणार आहेत. तर एका नागरिकाला ५ लाखांपर्यंतचे काम सुचविता येणार आहे. तर हे नागरिकांचे प्राप्त झालेले प्रस्ताव क्षेत्रीय कार्यालयांकडून १० ऑक्टोबरपर्यंत पालिका आयुक्तांना सादर करायचे आहे.महापालिकेच्या निवडणुका २०२२ पासून रखडलेल्या आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच, आपल्या परिसरात दैनंदिन वावर असल्याने नागरिकांना नेमकी कोणती कामे करणे आवश्यक आहे याचा अंदाज असतो. अनेकदा ही कामे नागरिकांकडून नगरसेवकांना सुचविली जातात. मात्र, ती ५ लाखांपेक्षा कमी असल्याने नगरसेवकांकडून त्याकडे लक्ष दिले जात नाही. त्यातच आता नगरसेवकही नाहीत. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अशा वेळी या सहभागी अंदाजपत्रकामुळे नागरिकांना आपल्या भागात विकासकामे सुचविता येणार असल्याने या उपक्रमास मागील तीन वर्षांपासून चांगला प्रतिसाद मिळत असून, दरवर्षी ३० कोटींपेक्षा अधिक तरतूद या कामांसाठी केली जात आहे. अशी असेल प्रभाग निहाय निधीची मर्यादा.. – एका प्रभागासाठी जास्तीत जास्त ७५ लाखांपर्यंत कामांचे प्रस्ताव. – दोन सदस्यीय प्रभागासाठी ५० लाखांचे प्रस्ताव. – एका प्रभागासाठी २५ लाखांचा निधी – तर प्रत्येक कामासाठी ५ लाखांची मर्यादा