नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये; पो. नि. संतोष गिरी गोसावी यांचे नागरिकांना आवाहन

पौड : मुळशीत चोऱ्या व ड्रोन बाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरांबाबत संशय आल्यास पोलिसांना संपर्क करावा, नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये असे आवाहन पो. नि. संतोष गिरी गोसावी यांनी नागरिकांना केले आहे.
मुळशीतील नागरिक चोरी होऊ नये म्हणून आपल्या कुटुंबाचे व गावचे रक्षण करण्यासाठी रात्रभर गस्त घालत गावातील कानाकोपऱ्यात फिरत आहेत. अशा वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे रात्रीचा प्रवास करणे प्रवाशांना सुद्धा धोकादायक झाला आहे.
मुळशीतील काही ठिकाणी खरोखरच चोरी झाल्याची घटना घडल्या आहेत. अन्य अनेक ठिकाणी अफवांचेही पीक आलेले आहे. कोणाच्या घराच्या दाराची कडी-कोयंडा खोलून तर कोणाच्या खिडकीचा गज वाकवून चोरी करण्याचे प्रयत्न झालेले होते. मात्र काही रहिवासी जागे असल्याने अथवा तेथील परिसरातील कुत्री भुंकल्यामुळे चोरांनी पोबारा केला. त्यानंतर अशा घटना काही रात्री वारंवार घडल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
नागरिकांनी सोशल नेटवर्कच्या माध्यमातून व्हाट्सअप फेसबुकच्याद्वारे अनेक ग्रुपवरती चोऱ्या झाल्याचे नागरिक अफवा पसरवत आहेत. त्यामुळे नागरिक, महिला, मुले यामध्ये घबराट निर्माण झालेली आहे.
पोलिसांकडून चोऱ्या कमी होण्यासाठी संबंधित भागामध्ये स्वतंत्रपणे रात्रीची गस्त घालण्यासाठी तीन टू व्हीलर व दोन फोर व्हीलर पोलीस गाडीने पेट्रोलिंग सुरू केलेली आहे. गावकऱ्यांना बरोबर घेऊन ते गावामध्ये गस्त घालत आहेत. संशय चेक करण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन केले आहे. गावकऱ्यांच्या मदतीने व माहितीने ड्रोनधारकांचा शोध सुरू आहे. अँटी ड्रोन गन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी सुरू आहे. मुळशीतील होणाऱ्या चोऱ्यांसंदर्भात व ड्रोनच्या दहशतीखाली असलेल्या नागरिकांनी घाबरून न जाता तसेच संशयित व्यक्ती आढळून आल्यास पौड पोलिसांना संपर्क करावा.
संपर्क क्रमांक – 7522-990100 / 02022943233संतोष गिरि गोसावी, पोलिस निरीक्षक, पौड पोलिस ठाणे





