पुणे – पुणे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम राखण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मैदानात उतरून काम करावे. कुठल्याही परिस्थितीत नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. मंत्रालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे बांधकाम व अन्य प्रश्नांसंदर्भात बैठक झाली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, अशोक पवार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्यातील पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्राधान्याने काम सुरू आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे पोलीस प्रशासनावर येणारा ताण कमी करण्यासाठी जिल्ह्यात काही नवीन पोलीस ठाण्यांना यापूर्वीच मंजुरी दिली आहे. तसेच, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळासह इमारत बांधकामांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावेत.