Chhagan Bhujbal | India-Pakistan : भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्याला प्रभावी उत्तर दिले आहे. सध्या या दोन्ही देशांत युद्धसदृश्य स्थिती आहे. यावेळी प्रत्येक नागरिक देखील त्यामध्ये जबाबदारीने आपले योगदान देऊ शकतो, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. छगन भुजबळ म्हणाले, काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. केंद्र सरकार आणि भारतीय सैन्याच्या प्रत्येक कृतीला विरोधी पक्षांनी मनापासून आणि जोरदार पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे सध्या तरी भारतापुढे अडचणी दिसत नाहीत. भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले. भारतीय सैन्याने अतिशय प्रखर आणि जबाबदारीने ही कारवाई केली. केवळ दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले. त्याविषयी भारतीय सैन्याकडून देखील स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मात्र पाकिस्तान हा सातत्याने दहशतवाद्यांच्या पाठीशी उभा राहत आला आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी त्याची प्रचिती दिली आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांच्या कृत्यांच्या समर्थनासाठी आणि त्यांना पाठराखण करण्यासाठी भारताविरोधात कारवाया करीत आहे. अमेरिकेसह विविध देशांनी पाकिस्तानला समज देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय सैन्याच्या दहशतवादी स्थळांवरील कारवाईला प्रत्युत्तर देऊ नये, असे अमेरिकेने स्पष्ट सांगितले होते. पाकिस्तानने त्या विरोधात कारवाई केली आहे. भारतीय सैन्य पाकिस्तानला धडा शिकविण्यास सक्षम आहे, असे भुजबळ म्हणाले.