कोंढवा, दि. 20 (प्रतिनिधी) -महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या उंड्री गावातील नागरिकांनी पालिकेच्या जाचक अटींच्या निषेधार्थ हनुमान मंदिर चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे. ग्रामपंचायतीच्या दराने करआकारणी करावी. पाणी, रस्ते, वीज, आरोग्याच्या सुविधा द्याव्यात, अशी मागणी उपोषणकर्ते नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. उंड्री ग्रामपंचायत कर कमी घेऊन सुविधा देत होती. मात्र, पालिका प्रशासन जास्तीचा कर घेऊनही सुविधा देत नाही. पालिका प्रशासनाकडून कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. कर मात्र भरमसाठ वसूल केला जात आहे. यामुळे आमची ग्रामपंचायत बरी होती, असे म्हणण्याची वेळ आली आहे. मागील चार वर्षांमध्ये 72 कोटी रुपये पालिकेने करवसूल केला आहे. मात्र पाणी, रस्ते, वीज, मलवाहिनी, सार्वजनिक स्वच्छतागृह, आरोग्य सुविधांची कोणतीही उपाययोजना केलेली नाही. ग्रामपंचायतीने दिलेल्याच सुविधा आहेत, पालिकेने कोणतीही सुविधा न देता अन्यायकारक कर लादून उंड्री गावातील नागरिकांवर अन्याय केला आहे. शेतकऱ्यांनी शेतामध्ये घर बांधले, त्याला तिप्पट कर आकारला आहे, मूलभूत सुविधा नसताना रेडिरेकनरचा दर कोंढवा-एनआयबीएमचा लावून वेठीस धरले आहे, रस्ते, मलवाहिनीची व्यवस्था करावी, बंद नलिकेतून पाणीपुरवठा करावा आदी मागण्यांसाठी सर्व पक्षीय उंड्री गाव संघर्ष समितीच्या वतीने साखळी उपोषण सुरू केल्याचे सांगण्यात आले. भाजपचे जालिंदर कामठे, राहुल शेवाळे, कॉंग्रेसचे संदीप बांदल, राष्ट्रवादीचे भरत झांबरे, पिसोळीचे दीपक धावडे, सुवर्णा पुणेकर, रिपाइंचे दिनेश डावरे, आपचे दिलीप गायकवाड आणि सोसायट्यांमधील अधिकारी व पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दिला. दरम्यान, मागण्यापूर्ण होत नाही तोपर्यंत तसेच अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देईपर्यंत सदर उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार केला असल्याचे सांगण्यात आले.