स्वीडनमधील नागरिकांना इराणकडून सूड घेण्याचे आवाहन

कोपनहेगनस (डेन्मार्क) : वर्षभरापूर्वी स्वीडनमध्ये धार्मिक ग्रंथाच्या अवमान प्रकरणी सूड घेण्याचे हजारो संदेश स्वीडनमधील नागरिकांना मोबाइलवर पाठवण्यात आले आहेत. या एसएमएसमागे इराणचा हात असल्याचा दावा स्वीडनने केला आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने डाटाची चोरी केली आणि सुमारे १५ हजार एसएमएस पाठवल्याचा आरोप स्वीडनमधील अधिकाऱ्यांनी केला आहे.
स्वीडनमध्ये गेल्या वर्षी उघडपणे धार्मिक ग्रंथाचा अवमान केला गेला होता. या प्रकरणी सूड घेण्याचे आवाहन या संदेशांमधून केले गेले आहे. या प्रकरणी स्वीडनमधील देशांतर्गत तपास संस्थांनी केलेल्या प्राथमिक तपासात या संदेशांमागे रिव्होल्युशनरी गार्डचा हात असल्याचा निष्कर्ष काढला गेला आहे. स्वीडनमधील एका कंपनीतून डाटाची चोरी करून हे संदेश पाठवले गेले होते.
या कंपनीचे नाव तपास संस्थांनी उघड केलेले नाही. ऑगस्ट २०२३ मध्ये हे संदेश पाठवले गेले होते आणि अन्झू टीम नाव असलेल्या गटाकडून हे संदेश पाठवले गेले होते. या संदर्भात इराणमधील प्रशासनाने तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.





