Satara | शाहूनगरच्या नागरिकांचा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव

सातारा, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने शाहूनगर, गोडोली, सदर बाजारच्या काही परिसरात वारंवार करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात तांत्रिक अडचणी येत आहेत.
खंडित पाणीपुरवठ्याला वैतागलेल्या शाहूनगर परिसरातील नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी घेराव घालत प्रत्यक्ष जाब विचारला.
तांत्रिक अडथळ्यांवर मात करून पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंता गडकरी यांनी दिले.
खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक सागर भोसले सामाजिक कार्यकर्ता एडवोकेट वर्षा देशपांडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांना खंडित पाणीपुरवठ्याचा जाब विचारला.
माहुली येथील पाणी उपसा केंद्रातील उपसा पंपाची अडचण तसेच खंडित वीज पुरवठा यामुळे पाणीपुरवठा खंडित होत असल्याची तांत्रिक अडचण शाखा अभियंता गडकरी यांनी सांगितली.
पंपिंग स्टेशन मध्ये लाईट नसणे वारंवार लाईट जाणे ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड होणे अशी कारणे आम्हाला वारंवार सांगितली जातात अशी तक्रार सागर भोसले यांनी केली तसेच माहुली येथील पंपिंग स्टेशनवर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सुद्धा बेमुदत आंदोलन सुरू आहे
त्यामुळे सुद्धा पाणीपुरवठा करायला जीवन प्राधिकरणाकडे प्रत्यक्ष कर्मचारी उपलब्ध नाहीत प्राधिकरण आणि कंत्राटी कर्मचारी यांच्यातील वादाचा प्रत्यक्ष फटका शाहूनगरमधील नागरिकांना बसत असून पाणीपुरवठा होत नसल्याने त्यांच्या दैनंदिन कामाचा खोळंबा होत आहे.
हा पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करावा अन्यथा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
उदयनराजे यांनी केल्या सूचना
उद्योजक सागर भोसले यांनी ही तक्रार थेट उदयनराजे यांना कथन केली. उदयनराजे भोसले यांनी गडकरी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून तांत्रिक अडचणी दूर करून पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करा.
यासंदर्भात निधीचे काही सहकार्य लागल्यास तसे प्रस्ताव देण्याविषयी सूचना केली. शाहूनगर नागरिकांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व सागर भोसले, वर्षा देशपांडे, सतीश यादव यांनी केले यावेळी शाहूनगर गोडोली सदर बाजार परिसरातील बहुशांश नागरिक उपस्थित होते





