रहिमतपूर, – विधानसभा निवडणुकीत कराड -उत्तर विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री बाळासाहेब पाटील व विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांच्यात अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. मनोज घोरपडे हे रहिमतपूरचे जावई आहेत. रहिमतपूर येथे झालेल्या जाहीर सभेतून अनेकांनी रहिमतपूरच्या जावयांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रहिमतपूरमधून मनोज घोरपडे यांना 1,662 मतांचे मताधिक्य मिळालेले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर रहिमतपूर येथील भाजप शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रचंड मोठ्या प्रमाणात विजय साजरा केला . गुलालाची उधळण फटाक्यांची आतष्यबाजी व डीजेच्या तालावर अनेकांनी ताल धरत मनोज घोरपडे यांचा विजयाचा जल्लोष केला. रहिमतपूर नगरपालिकेवर अनेक वर्षापासून सुनील मानेंची अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. सुनील माने शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे बाळासाहेब पाटील यांना मताधिक्य देण्यासाठी सुनील माने यांनी जोर लावला होता. काही झालं तरी रहिमतपूर शहरातून बाळासाहेब पाटील यांना चांगली मते मिळतील असे बोलले जात होते. परंतु निकालानंतर बाळासाहेब पाटील यांचा पराभव तर झालाच त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सुनील माने यांच्या होम ग्राउंडमधून मनोज दादा यांना मताधिक्य मिळाले आहे. रहिमतपुर मधून मनोज दादा घोरपडे यांच्या प्रचारासाठी भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सौ चित्रलेखा माने कदम, माजी नगराध्यक्ष संपतराव माने , शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, माजी विरोधी पक्षनेते निलेश माने, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन बेलागडे यांच्यासह अनेकांनी कष्ट घेतले होते. याचे फळ निवडणूक निकालानंतर दिसून येत असून रहिमतपूर येथील जनतेने भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्या पाठीशी आपली पूर्ण ताकद लावली असल्याचे दिसून येत आहे. रहिमतपूर येथून आजपर्यंत कोणी आमदार झाले नव्हते परंतु जावयाच्या रूपाने हक्काचा आमदार भेटला आहे.