भोर नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे नागरिक त्रस्त; ऐन सणासुदीत पाणीटंचाईचा फटका, बुधवारी ‘या’ भागातील पाणी बंद

भोर : भोर नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे शहरातील नागरिकांना सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. रा. मा. क्र. ११९ च्या CH ९० + ६८० येथे रोड क्रॉसिंगच्या कामासाठी उद्या बुधवारी, दि. २७ ऑगस्ट रोजी मंगळवार पेठ, वेताळ पेठ, धुमाळ नगर, श्रीपती नगर, श्री शिवाजी हौसिंग सोसायटी, रामबाग आणि चौपाटी या भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. विशेष म्हणजे, याच कारणासाठी गत शनिवारी, दि. २३ ऑगस्ट रोजीही संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. सणासुदीच्या काळात वारंवार पाणी खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.
नागरिकांचा उद्रेक: “धरण उशाला, कोरड घशाला”
भोर परिसरात धरण असूनही पाणीटंचाईची समस्या कायम आहे. “धरण उशाला आणि कोरड घशाला,” अशी खंत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात पाण्याअभावी घरगुती कामे, स्वच्छता आणि दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहे. “नगर परिषदेला नियोजनाचा लवलेश नाही. एकाच कामासाठी दोनदा पाणी बंद? हा आमचा अपमान आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवासी व्यक्त करत आहेत. भोर शहराजवळ असलेले भाटघर धरण हे शंभर टक्के भरले असूनही भोर शहरातील नागरिकांना मात्र पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
नियोजनशून्य कारभार –
“नगर परिषदेचा कारभार मनमानी पद्धतीने चालतो. पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत सेवेतही नियोजनाचा अभाव दिसतो,” अशी खंत श्रीपती नगरमधील एका रहिवाशाने व्यक्त केली. सणासुदीच्या काळात पाण्याशिवाय नागरिकांची गैरसोय होत असताना प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना दिसत नाही. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन नगर परिषदेने केले असले, तरी वारंवारच्या पाणी कपातीमुळे नागरिक हैराण आहेत.





