Pimpri : पिंपरीतील निकृष्ट कामामुळे नागरिक हैराण

पिंपरी : पिंपरीतील काही भागांत रस्त्यावर टाकलेले पाव्हिंग ब्लॉक उखडले आहेत. ड्रेनेज लाईनची झाकणेही उखडलेले आहेत. या निकृष्ट कामामुळे पावसाचे पाणी साचून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. संबंधित यंत्रणेकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक ॲड. दत्ता झुळुक यांनी व्यक्त केली आहे.
नुकत्याच झालेल्या पावसात रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी उघडे ड्रेनेज आणि उखडलेले पाव्हिंग ब्लॉक नागरिकांच्या अपघाताला निमंत्रण देत आहेत. स्थानिक रहिवाशांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष सुरूच आहे.कामाच्या गुणवत्तेकडे कुठलेच लक्ष दिले जात नाही.
टेंडर देताना दर्जा तपासत नाहीत आणि नंतर डागडुजीच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जातो, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. महापालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.





