प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पोलिसांनी सराईत चोरट्यांचा थरारक पाठलाग करत त्यांना गाठले, परंतु एका चोरट्याने थेट पोलिसांवर गोळीबार केला. एका पोलीस हवालदाराने दाखविलेल्या प्रसंगावधानाने गोळी कारच्या छताला लागली व पोलीस बचावले. हा प्रकार सोमाटणे टोलनाक्याजवळ घडला. पोलिसांनी तिघांना पकडले असून त्यांच्याकडून दोन पिस्टल, सात काडतूस, धारदार शस्त्रे, दागिने जप्त करण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये घरफोडी-चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या विशेष सूचनेनुसार गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत सनीसिंग पापासिंग दुधानी (वय २४, हडपसर, पुणे), जलसिंग राजपुतसिंग दुधानी (वय ३२, रामटेकडी, हडपसर), मनीष बाबुलाल कुशवाह (वय २८, मध्य प्रदेश), या तिघांना अटक करण्यात आली आहेत. यात दोन देशी बनावटीची पिस्टल, सात जिवंत काडतुसे, चोरीचे सोने-चांदीचे दागिने व इतर मुद्देमाल असा एकूण ८ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरवारी पहाटे ५.३० वाजता गुन्हे शाखा युनिट-२ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या पथकाला सोमाटणे टोलनाक्याजवळ गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रावेत पोलीस ठाण्याच्या गुन्हा मधील संशयित आरोपी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील चोरीची सेलेरिओ कार (क्र. MH-14-JE-2628) घेऊन येणार आहेत. पथकाने सापळा रचला, माहिती प्रमाणे राखाडी रंगाची सेलेरिओ कार दिसताच थांबण्याचा इशारा पोलिसांनी दिला. मात्र कारमधील आरोपींनी पळ काढला आणि एका आरोपीने वपोनि अरविंद पवार व त्यांच्या पथकावर ठार मारण्याच्या उद्देशाने गावठी पिस्टलमधून गोळी झाडली. पोहवा भाऊसाहेब राठोड यांनी प्रसंगावधान दाखवत आरोपीचे हातातील पिस्टल हिसकावण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे गोळी कारच्या छताला लागून आरपार गेली. यावेळी शिताफीने पोलिसांनी तिघांना पकडले आहे. गुन्ह्यांची अर्धशतके करणारे सराईत पकडलेल्या तीन आरोपींपैकी सनीसिंग पापासिंग दुधानी याच्यावर ७० तर आरोपी जलसिंग राजपुतसिंग दुधानी याच्यावर ५० गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या ताब्यातून २ गावठी पिस्टल, ७ जिवंत काडतुसे, चोरीचे सोने-चांदीचे दागिने, धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली. ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोउप (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि अरविंद पवार, पोउनि रोहित पाटील, पोहवा विक्रम कुदळ, राठोड व पथकाने केली.आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांकडून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.