– सोनम परब जम्मू-काश्मीरमध्ये नुकतीच सिनेचित्रीकरणासाठी 300 नवी ठिकाणे शोधण्यात आली आहेत. गेल्या वर्षभरात चित्रपट, वेबसिरीज आणि नाटक यांची एकूण 200 चित्रीकरणे काश्मीरमध्ये पार पडली. “बेमिसाल’मधील “कितनी खूबसुरत ये तस्वीर है, मौसम बेमिसाल बेनझिर है, यह कश्मीर है… यह कश्मीर है… हे गाणे पाहिले किंवा ऐकले तरी काश्मीरचे सौंदर्य डोळ्यासमोर आल्याशिवाय राहात नाही. काश्मीरचे सौंदर्य हे बॉलीवूडसाठी नेहमीच “विक पॉइंट’ राहिला आहे. सनी देवल आणि अमृता सिंग यांच्या “बेताब’चे शूटिंग काश्मीर खोऱ्यातच झाले. हा चित्रपट एवढा गाजला की जेथे या चित्रपटाचे शूटिंग झाले, त्या भागाला “बेताब व्हॅली’ असे नाव पडले. कालांतराने ते पर्यटनस्थळ बनले. हे ठिकाण पहेलगामपासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. “सत्ते पे सत्ता’ मधील घर देखील सोनमर्ग येथे आहे. अलीकडच्या काळातील उदाहरण घेतल्यास “कश्मीर फाइल्स’ हे उत्तम उदाहरण ठरले. चार वर्षांपूर्वी फितूरचे शूटिंग काश्मीरमध्ये झाले. या चित्रपटात गरीब घरातील एक काश्मीर युवक नूर मोहंमद म्हणजेच आदित्य राय कपूरचे प्रेम मोठ्या खानदानातील मुलगी फिरदौस-कतरिना कैफबरोबर होते. दिग्दर्शक अभिषेक कपूरने या प्रेमकहानीतून काश्मीर दर्शन घडवण्याचा प्रयत्नही केला. 1992 च्या “रोजा’ चित्रपटाने काश्मीरमधील वास्तव दाखविले. मणिरत्नम यांना काश्मीरची नेहमीच भुरळ पडली आहे. सुरुवातीला संपूर्ण चित्रपट काश्मीरमध्येच करण्याबाबत ते आग्रही होते. यात दक्षिण भारतातील ऋषी आणि रोजा यांच्या निमित्ताने काश्मीरला केंद्रित केले होते. ऋषीचे दहशतवाद्यांकडून अपहरण होते आणि त्याला सोडवण्यासाठी त्याच्या पत्नीने रोजाने केलेले प्रयत्न अप्रतिमरित्या साकारले आहे. विशाल भारद्वाज यांची आवडती जागा दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनाही काश्मीर हे शूटिंगसाठी आवडते ठिकाण. “सात खून माफ’ आणि “हैदर’ या दोन्ही चित्रपटासाठी त्यांनी काश्मीरमध्ये भटकंती केली आहे. त्याचबरोबर दालसरोवर, पहलगाम, अनंतनाग, मत्तन, गुलमर्ग, जुने श्रीनगर, निशात बाग, काझीगुंड, मार्तलॅंड, सन टेंपल, काश्मीर युनिर्व्हसिटी गार्डन, हजरतबाल आदी ठिकाणे त्यांनी कलात्मक रितीने कॅमेरात बंदिस्त केले होते. गुलजारचीही कलाकृती दिग्दर्शक गुलजार यांनी “माचिस’ चित्रपटाच्या निमित्ताने काश्मीरच्या स्थितीचे दर्शन घडवले. दहशतवादी होण्यामागची कारणे त्यांनी चित्रपटातून सादर केली. युवक दहशतवाद्यांच्या फसव्या आवाहनाना कसे फसतात आणि ते दिशाहीन होऊन कसे भटकतात व शेवटी कालांतराने पुन्हा सत्याचा मार्ग कसा धरतात, हे आपल्याला माचिसमध्ये पाहावयास मिळते. सुजित सरकार यांचे काश्मीर प्रेम सुजित सरकार यांनी “यहॉं’ चित्रपटात काश्मिरी युवती मनीषा लांबा आणि सेनाधिकारी जिमी शेरगिल यांची प्रेमकथा साकारली आहे. यात काही कटू आणि गोड बाजू होत्या. विधू विनोद चोप्रा यांचे स्वप्न पूर्ण काश्मिरीचे रहिवासी विधू विनोद चोप्रा यांनी “मिशन काश्मीर’ साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि ती पूर्ण केली. यात ते यशस्वी ठरले. ते काश्मिरी असल्याने तेथील सर्वकाही गोष्टी चांगल्या रितीने जाणून आहेत. त्यामुळे त्यांनी दहशतवाद्यांची तमा न बाळगता या चित्रपटाला एक काश्मीरियन लूक दिला. यातील आघाडीचे कलाकार ऋतिक रोशन आणि प्रीती झिंटा हेच केवळ काश्मिरी वाटत नव्हते तर संपूर्ण कलाकारच काश्मीरचे आहेत की काय, असा भास निर्माण झाला होता. जब जब फूल खिले स्वर्गीय शशी कपूर यांना स्टार करण्यात “जब जब फूल खिले’ या चित्रपटाचा सिंहाचा वाटा राहिला आहे. या चित्रपटाच्या पटकथेचा आधारही काश्मीर होता. या चित्रपटात शिकारा चालवणाऱ्या नावाड्याचा रोल केला होता. अप्पू खुदा हे त्यांचे गीत कमालीचे गाजले. काश्मीरचे खरे नायक याहू स्टार शम्मी कपूर यांचे काश्मीरशी अतिशय भावनिक नाते होते. त्यांनी बहुतांश चित्रपट काश्मीरमध्येच केले आहेत. काश्मीर खोरे अजूनही शम्मी कपूरचे गाणे गुणगुणताना दिसून येते. इशारो- इशारो में, दीवाना हुआ बादल, तुमसे अच्छा कौन है, सुभान अल्लाह हसीन चेहरा… यासारखी शम्मी कपूर यांची डझनभर हिट गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. काश्मीर की कली, जानवर, जंगली, तुमसा अच्छा कौन है आदी चित्रपटांची शूटिंग काश्मीरमध्येच झाली आहे. “काश्मीर की कली’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शम्मी कपूर यांना तेथील जीवनशैली खूपच भावली. तेथील अनेक स्थानिक नागरिक त्यांचे मित्र बनले होते. एवढेच नाही तर शिकाराचा व्यवसाय करणाऱ्यांना ते नावाने ओळखत होते. नागरिक रस्त्यात उभे राहून फुलांचा गुच्छ देऊन त्यांचे स्वागत करत असत. ज्युबिलीकुमारचेही आवडते ठिकाण ज्युबिली कुमार म्हणजे राजेंद्रकुमार यांनाही काश्मीरमध्ये शूटिंग करण्यास आवडायचे. आंस की पंछी, आरजू, अनजाना, आप आए बहार आयी, सूरज आदी अनेक चित्रपटांची शूटिंग काश्मीरला झाली आहे. रामानंद सागर यांचा सुपरडुपर हिट “आरजू’चे बहुतांश शूटिंग काश्मीरला झाले आहे. ऐ फुलों की रानी, बहारों की मलिका, अजी रुठ कर कहा जाइएगा यासारखी हिट गाणी काश्मीरचेच देणं आहे. यश चोप्रांचेही काश्मीर प्रेम रोमॅंटिक चित्रपटांचे बादशहा यश चोप्रा यांनी एकदा चर्चेदरम्यान काश्मीरबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या. दाग, कभी कभी, सिलसिला, विजय, नूरी आदी अनेक चित्रपटांचे शूटिंग त्यांनी काश्मिरात केले होते. एकदा स्थिती बिघडलेली असतानाही त्यांनी सिलसिलातील दोन गाणी पूर्ण केली होती.