सोनम परब बहुतांश कलाकार “प्लॅन बी’ तयार करून त्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. जोड व्यवसायावर भर देऊन चित्रपट उद्योगातील होणारे संभाव्य नुकसान भरून काढत आहेत. साइड बिझनेसचा ट्रेंड वाढला एक काळ असा होता की, जेव्हा राजकपूर, दिलीपकुमार, देवानंदसारखे कलाकार हे चित्रपटाशिवाय कोणताच विचार करत नव्हते. त्यामुळे त्यांनी आपली सर्व कमाई फिल्म उद्योगातच गुंतवली आणि याच उद्योगातून उत्पन्न मिळवण्याचे ठरवले. परंतु आज केवळ बडे नाही तर लहानसहान कलाकारदेखील साइड बिझनेस करत आहेत. एखाद्या मोठ्या कलाकाराचे किंवा नायिकेचे मुंबईत घर नाही, असे होत नाही. 1980-90 च्या दशकात प्रत्येक कलाकार हा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायचा. त्यानंतर प्रॉडक्शन हाउसमध्ये गुंतवणूक करण्यास रुची वाढली. अजय देवगणने दोन दशकांपूर्वी अजय देवगण नावाने स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. त्यानंतर व्हीएफएक्स नावाचा स्टुडिओ देखील तयार केला. अजय देवगणच्या स्टुडिओत सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. आगामी काळात अशा प्रकारच्या स्टुडिओंना चांगली मागणी राहणार आहे. वेब सिरजिमध्ये गुंतवणूक करण्यास बरेच जण घाबरत आहेत. कारण यातही आता स्पर्धा वाढली आहे. करोनाचा परिणाम करोना काळात आणि नंतर चित्रपट उद्योगातील बहुतांश नायकांनी दुसऱ्या किंवा तिसऱ्या उत्पन्नासाठी आपला पैसा फ्लॅटऐवजी अन्य स्टार्टअप्समध्ये गुंतवण्यास सुरुवात केली. नवनवीन ऍप्समध्ये पैसा टाकला. त्याचबरोबर आपल्या ब्रॅंडिंगला आणखी चमक देण्यासाठी वेळही देऊ लागले. या आधारावर प्रमोशनलचे काम मिळावे हा यामागचा उद्देश. शाहरुख खानचा विचार केला तर त्याच्याकडे कोलकाता नाइट रायडर्ससारखी आयपीएल टीम आहे. यापासून त्याला करोडो रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळते. नवीन गुंतवणूक अक्षयकुमार हा सध्याच्या काळात सर्वाधिक कमाई करणारा नायक आहे. अलीकडेच त्याने अनेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे आणि आगामी काळात तो फिटनेस कंपनीतही गुंतवणूक करू शकतो. गेल्या काही दिवसांत शेअर बाजार बराच घसरला. त्यात अनेक नायकांना फटका बसला. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यात नायक-नायिका फारसे उत्सुक नाहीत. म्हणूनच बहुतांश कलाकार मंडळी आता स्टार्टअपवर विश्वास ठेवत आहेत. सुनील शेट्टी हा मोठा उद्योजक सुनील शेट्टी हा चित्रपटात काम करून खूप पैसा कमावतो. पण त्याचवेळी तो अन्य व्यवसायातून देखील उत्पन्न मिळवतो. सुनील शेट्टी हा जिम कंपनीचा मालक आहे. या जिमची फ्रंचाइजी संपूर्ण भारतात विखुरलेली आहे. सुनील शेट्टी हा फिल्म प्रॉडक्शन “पॉपकॉर्न एंटरटेनमेंट’चा मालक आहे. या माध्यमातून त्याने डझनभर चित्रपटांची निर्मिती केली आहे. चित्रपटात येण्यापूर्वी सुनील शेट्टी हा रेस्टॉरंट व्यवसायात होता. शेट्टी हा मिस्चिफ डायनिंग बार आणि क्लब एचटूओचा देखील मालक आहे. त्याचा रिअल इस्टेटचा देखील व्यवसाय आहे. फिटनेस सेक्टरचा करिश्मा कलाकारांचा आजही फिटनेस सेक्टरवर अधिक विश्वास आहे. ऋतिक रोशन आणि सलमान खान यांची सर्वाधिक गुंतवणूक याच क्षेत्रात आहे. ऋतिक रोशनने बंगळुरू येथील प्रसिद्ध जिम क्योर फिटमध्ये भागीदारी केली आहे. त्यांचा स्वत:चा फॅशन ब्रॅंड एचआरएक्स आहे. यात त्याने बरीच गुंतवणूक केली आहे. दक्षिणेतील स्टार उद्योजक दक्षिणेतील मंडळी देखील साइड बिझनेसमध्ये मागे नाहीत. नागार्जुन हा टॉलीवूडचा यशस्वी नायक म्हणून ओळखला जातो. अभियनाबरोबरच “एन-ग्रील’ आणि “एन एशियन इंटर्स’चा तो मालक आहे. याशिवाय हैदराबाद येथे ज्युबली हिल्स येथे स्वत:चे रेस्टॉरंटदेखील आहे. दक्षिणेतील सुपरस्टार रामचरण हा ट्रजेट नावाच्या एअरलाइन्स कंपनीचा मालक आहे. ही हैदराबाद येथील एअरलाइन कंपनी असून ती टर्बो एव्हिएशनची सहायक कंपनी आहे. त्याचबरोबर चरण हा हैदराबाद पोलो आणि रायडिंग क्लबचा मालक आहे. दक्षिण आणि बॉलीवूडची अभिनेत्री श्रुती हासनने साइड बिझनेस म्हणून इसिड्रो नावाने एक प्रॉडक्शन हाउस सुरू केले आहे. राणा दग्गुबत्ती हा सीएए क्वान नावाच्या एक टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचा सह संस्थापक आहे. याशिवाय त्याची एक टेक कंपनी आहे. त्याचे स्वत:चे कॉमिक बुक आणि एक प्रॉडक्शन हाउसदेखील आहे. तमन्ना भाटिया ही व्हाइट आणि गोल्ड नावाच्या एक ऑनलाइन ज्वेलरी ब्रॅंडची मालकीण आहे. थलपती विजयचा चेन्नईत स्वत:चे एक वेडिंग हॉल आहे. तो जोड व्यवसाय म्हणून चालवतो. बॉलीवूड नायिकादेखील आघाडीवर बॉलीवूड कलाकारांनी उत्पन्नासाठी नवनवीन स्रोत शोधलेले असताना नायिका देखील त्यापासून मागे राहिल्या नाहीत. दीपिका पदुकोन आणि अनुष्का शर्मा यांना गुंतवणुकीचा चांगला सेन्स असल्याचे समजले जाते. ब्यूटी प्रॉडक्ट्स, फर्निचर आणि फॅशन ब्रॅंडमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यापासून चांगली मिळकतदेखील होत आहे. दीपिकाच्या सल्ल्यानुसार अन्य नायिकांनी देखील अभिनयातून मिळालेला पैसा हा अन्यत्र ठिकाणी गुंतवण्यास सुरुवात केली आहे. शिल्पा शेट्टी ही रेस्टॉरंट व्यवसायाबरोबरच स्वत:चे यूट्यूब चॅनेल चालवते. या माध्यमातून ती लोकांना आरोग्यविषयी टिप्स देते. प्रियांका चोप्रा ही “अनोमली’ नावाने हेअर केअर ब्रॅंड चालवते. त्याचबरोबर ती न्यूयॉर्कमध्ये एक रेस्टॉरंटदेखील चालवते. सुष्मिता सेनचे स्वत:चे रेस्टॉरंट आहे. त्याचबरोबर ती दुबईत एक ज्वेलरी शोरूमची मालकीण आहे. मलायका अरोरा ही योग स्टुडिओ चालवण्याबरोबरच लेबल लाइफ नावाने आपल्या कपड्यांचे ब्रॅंड देखील चालवते. कतरिना कैफचा कॉस्मेटिक व्यवसाय आहे. ती ब्यूटी नावाने आपल्या प्रॉडक्टची विक्री करते. सनी लिओनचा देखील स्वत:चा कॉस्मेटिक ब्रॅंड आहे. त्याचबरोबर ती सनसिटी नावाने प्रॉडक्शन हाउसदेखील चालवते. एकुणातच आजचे कलाकार हे खूपच व्यावहारिक झाले आहेत. चित्रपट उद्योगाला नेहमीच मागणी असते, असे नाही हे त्यांना कळून चुकले आहे. अशावेळी उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता राहते. त्यामुळे भविष्यातील आर्थिक सुरक्षितता मिळवण्यासाठी कलाकार मंडळी जोरदार कामाला लागली आहेत.