Vidya Balan Jailer 2: हातात सिगारेट, चेहऱ्यावर दबंग अंदाज; विद्या बालनचा ‘जेलर 2’मधील ‘कांथा’ लूक पाहून चाहते थक्क!
Vidya Balan Jailer 2 मिथुन चक्रवर्ती ‘जेलर 2’मध्ये मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विद्या बालनची व्यक्तिरेखा चित्रपटाच्या कथेत नेमकी काय भूमिका बजावते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Vidya Balan Jailer 2: रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच चर्चा निर्माण केली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘जेलर 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता आहे. त्यात आता बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचीही या चित्रपटात एंट्री झाली आहे. नुकताच तिच्या व्यक्तिरेखेचा एक खास व्हिडीओ समोर आला असून, तिचा हटके अंदाज चर्चेचा विषय ठरत आहे.
विद्या बालनचा हटके अंदाज
‘जेलर 2’च्या निर्मात्यांकडून चित्रपटातील वेगवेगळ्या व्यक्तिरेखांचे फर्स्ट लूक समोर आणले जात आहेत. आता विद्या बालनच्या ‘कांथा’ या व्यक्तिरेखेचा लूक समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये विद्या निळ्या रंगाची साडी आणि काळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केलेली दिसत आहे.
विद्या हातात सिगारेट घेऊन जिन्यावरून खाली येताना दिसते. त्यानंतर ती एका खोलीत प्रवेश करते. तिच्या चेहऱ्यावरील भाव आणि चालण्यातील आत्मविश्वासामुळे तिचा हा लूक आणखी खास वाटतो. विद्या बालनचा हा अंदाज तिच्या याआधीच्या अनेक भूमिकांपेक्षा वेगळा दिसत आहे. व्हिडीओची झलक काही सेकंदांची असली तरी ‘कांथा’ ही व्यक्तिरेखा दमदार असल्याचं दिसून येतं. त्यामुळे या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Vidya Balan ‘Jailer 2’
‘कांथा’ कोण आहे?
विद्या बालनच्या ‘कांथा’ या व्यक्तिरेखेबाबत निर्मात्यांनी अद्याप फारशी माहिती जाहीर केलेली नाही. मात्र, काही रिपोर्ट्सनुसार ती चित्रपटात मिथुन चक्रवर्ती यांच्या व्यक्तिरेखेच्या मोठ्या मुलीची भूमिका साकारू शकते. मिथुन चक्रवर्ती ‘जेलर 2’मध्ये मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विद्या बालनची व्यक्तिरेखा चित्रपटाच्या कथेत नेमकी काय भूमिका बजावते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मोठी स्टारकास्ट
‘जेलर 2’मध्ये रजनीकांत यांच्यासोबत अनेक मोठे कलाकार दिसणार आहेत. पहिल्या भागातील काही कलाकार या चित्रपटातही कायम आहेत. राम्या कृष्णन, योगी बाबू, मिर्ना आणि ऋत्विक यांचा यात समावेश आहे.
याशिवाय एस.जे. सूर्या, मिथुन चक्रवर्ती, सूरज वेंजारामूडू आणि जतिन सरना हे कलाकारही चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे ‘जेलर 2’मध्ये जुन्या आणि नव्या कलाकारांचा मोठा मेळ पाहायला मिळणार आहे. याशिवाय मोहनलाल, शिवा राजकुमार आणि विजय सेतुपती यांच्या कॅमिओ भूमिकांचीही चर्चा आहे. त्यामुळे चित्रपटात प्रेक्षकांना अनेक सरप्राइज मिळण्याची शक्यता आहे.
15 ऑक्टोबरला होणार रिलीज
‘जेलर 2’चं दिग्दर्शन नेल्सन दिलीप कुमार करत आहेत. सन पिक्चर्स या चित्रपटाची निर्मिती करत आहे. अनिरुद्ध रविचंदर यांनी चित्रपटाचं संगीत दिलं आहे. हा चित्रपट 15 ऑक्टोबर 2026 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. रजनीकांत यांचा स्वॅग, मोठी स्टारकास्ट आणि आता विद्या बालनचा दमदार ‘कांथा’ लूक यामुळे ‘जेलर 2’बाबत प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. मात्र, विद्या बालनची व्यक्तिरेखा नेमकी कशी असेल आणि कथेत तिची भूमिका किती महत्त्वाची असेल, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होईल.





