गुन्ह्यांची उकल करण्यास सीआयडीचा ‘ठसा’

नऊ महिन्यांत 57 गुन्ह्यांची उकल
पुणे – राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडीच्या) अंगुली मुद्रा केंद्राने (फिंगर प्रिंट) राज्यातील विविध प्रकारच्या 57 गुन्ह्यांची उकल बोटांच्या ठशांवरून केली. जानेवारी ते सप्टेंबर 2020 या नऊ महिन्यांत ही कामगिरी केली आहे. तर, 2019 मध्ये फिंगर प्रिंटच्या मदतीने 182 गुन्हे उघडकीस आले.
जिवंत तसेच मृत व्यक्तीची ओळख त्या व्यक्तीच्या बोटांच्या ठशांवरून पटविता येते. यासाठी सीआयडीमध्ये “फिंगर प्रिंट’ हा विभाग कार्यरत आहे. या विभागात तज्ज्ञ अधिकारी बोटांच्या ठशांद्वारे गुन्हेगारांची कुंडली तयार करतात.
मागील नऊ महिन्यांत बोटांच्या ठशांवरून गुन्हे शोधण्यात यश आले आहे. यामध्ये खून, बलात्कार, दरोडा, चोरी, घरफोडी यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी सापडलेल्या बोटांचे ठसे गोळा करून फिंगर प्रिंट तज्ज्ञ त्याचा अभ्यास करतात. यापूर्वी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये पकडलेल्या गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे नव्याने गोळा केलेल्या ठशांशी जुळतात का? याची पाहणी केली जाते. त्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल संबंधीत पोलीस ठाण्यात पाठविला जातो. बोटांच्या ठशांच्या मदतीने अनेक अवघड गुन्हे उघडकीस आल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.
फिंगर प्रिंट विभागाचे मुख्य कार्यालय पुण्यात असून मुंबई, नागपूर व औरंगाबाद येथे तीन विभागीय कार्यालये आहेत. तसेच 42 जिल्ह्यांतील पोलीस विभागात जिल्हा अंगुली मुद्रा कार्यालय आहेत. या विभागांत विविध प्रकारच्या गुन्ह्यांत अटक व शिक्षा झालेल्यांच्या 10 बोटांच्या ठशांची माहिती ठेवली जाते.
तब्बल 6 लाख 85 हजार गुन्हेगारांचे ठसे
आजपर्यंत 6 लाख 85 हजार 616 गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे गोळा केले आहेत. करोना काळात पोलिसांप्रमाणेच फिंगर प्रिंट विभाग 24 तास कार्यरत होता. या विभागातील 12 तज्ज्ञांना करोनाची लागण झाली होती.





