जौनपूर सदरमध्ये यंदा चुरशीची लढत

मुस्लीम मतांतील विभाजनाचा मिळू शकतो लाभ
मंत्री गिरीश यादव यांच्यासाठी वाट सोपी नाही
जौनपूर – उत्तर प्रदेशातील जौनपूर सदर जागेवर सध्या विलक्षण चुरशीची निवडणूक पहायला मिळत आहे. या ठिकाणी सपा, बसपा आणि कॉंग्रेसने मुस्लिम उमेदवार उभे केल्यामुळे, मुस्लिम मतांच्या विभाजनामुळे भाजपला ही जागा जिंकण्याचा विश्वास आहे. तथापि खराब रस्ते, शहरातील दैनंदिन वाहतूक कोंडी, महागाई, बेरोजगारी आणि भटकी जनावरे या समस्यांमुळे भाजपचे आमदार गिरीश यादव यांच्यासाठी ही निवडणूक आता तितकी सोपी राहिलेली नाही. यादव हे योगी आदित्यनाथ सरकारमध्ये मंत्री आहेत.निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात जौनपूरमध्ये 7 मार्चला मतदान होणार आहे.
या मतदार संघात समाजवादी पक्षाने मोहम्मद अर्शद खान, बसपाने सलीम खान आणि कॉंग्रेसने नदीम जावेद यांना उमेदवारी दिली आहे. 2012 मध्ये कॉंग्रेसच्या तिकीटावर नदीम जावेद या जागेवरून निवडून आले होते. 2017 च्या निवडणुकीत ते सपा-कॉंग्रेस युतीचे उमेदवार म्हणून रिंगणात होते पण यादव यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. स
पा उमेदवार मोहम्मद अर्शद खान, हे 1993 मध्ये या भागातून सपा-बसपा युतीचे आमदार होते, त्यावेळचा करिष्मा आपण या निवडणुकीतही दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. बसपचे सलीम खान आपली पारंपरिक दलित व्होट बॅंक आणि या भागातील मुस्लीम समाजाला एकत्र करून आपला लढा मजबूत करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
तर दुसरीकडे, कॉंग्रेसचे उमेदवार जावेद यांना पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या “लडकी हूं, लड सकती हूं” मोहिमेमुळे महिलांचा पाठिंबा आणि शिक्षित वर्गाकडून मिळणारा पाठिंबा या आधारे आपण ही निवडणूक जिंकू शकतो असा आत्मविश्वास आहे.जौनपूर जिल्हा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीला लागून आहे.
जौनपूर सदर विधानसभा मतदार संघात एकूण साडे तीन लाखांहून अधिक मतदार आहेत आणि त्यात मुस्लीम मतदारांची संख्या 90,000 पेक्षा जास्त आहे.या मतदार संघात वैश्य आणि मौर्य समाजासह क्षत्रिय मतदारांची संख्याही लक्षणीय आहे.





