वाकसई येथे सराईत चोरटा गजाआड

कार्ला (वार्ताहर) – मौजे वाकसई (ता. मावळ) हद्दीत एका बंगल्यात चोरी करणाऱ्या अट्टल चोऱ्या करणाऱ्या चोराला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून चोरट्याला जेरबंद केले आहे.

वसील सल्लाउद्दिन चौधरी (वय 24, रा. वाकसई, ता. मावळ) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जुलैच्या मध्यरात्री बारा ते पहाटे तीनच्या दरम्यान वाकसई गावाच्या हद्दीतील कॅमेलिया सोसायटीमध्ये एका बंगल्याच्या बंद स्लायडिंगची खिडकी उचकटत बंगल्यात प्रवेश केला. या अज्ञात चोरट्याने बॅगमध्ये ठेवलेली 12 हजार रुपयांची रोकड लंपास केली होती.

या प्रकरणी प्रमजी गड्डा (वय 50) यांनी 29 जुलैला दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी लोणावळा ग्रामीणचे निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित गुन्हेगार वसील चौधरी यांच्यावर पाळत ठेवली. त्यानंतर सापळा रचत रहात्या घरातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने संबंधित बंगल्यात चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरलेली रक्‍कम पोलिसांकडे सुपूर्द केली. या आरोपीस वडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, कोठडीमध्ये चौधरी याने लोणावळा शहरातील लोढा बंगला येथे पाच दिवसांपूर्वी चोरी केल्याची कबुली दिली आहे. चौधरी हा अट्टल गुन्हेगार असून, त्याच्या विरोधात गावठी कट्टा बाळगणे, चोरी, घरफोड्या, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत. त्याची विश्‍वासत घेऊन कसून चौकशी केल्यास ग्रामीण परिसरात होणाऱ्या चोऱ्या सारख्या गुन्ह्यांचा शोध लागू शकतो पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी सांगितले. लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या पथकातील जितेंद्र दीक्षित, हनुमंत शिंदे, शरद जाधवर, गणेश होळकर, रफिक शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.