जुन्नर तालुक्यात चित्रनगरी प्रकल्प उभारणार?

जुन्नर (वार्ताहर): “माझ्या मतदारसंघातील माळशेज परिसरात अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे चित्रीकरण झाले असून आता पर्यटन तालुक्याचा दर्जा मिळालेल्या जुन्नर परिसरात चित्रनगरी प्रकल्प उभारावा”, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत केली आहे.
लॉकडाऊन शिथिल करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर नाट्य, चित्रपट व मालिका निर्मात्यांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आपली भूमिका मांडताना डॉ. कोल्हे म्हणाले की, रोजगाराच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टिकोनातून मुंबईसह इतर ठिकाणी देखील चित्रिकरण करण्यासाठी चित्रनगरी प्रकल्प राबवता येऊ शकेल.
लॉकडाऊनमुळे संपूर्ण हंगाम बुडाल्याने अडचणीत आलेल्या तमाशा फडमालकांना विनातारण कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणीही खासदार कोल्हे यांनी याप्रसंगी केली. पुढे बोलताना ते म्हणाले की तमाशा व्यवसायाचा हंगाम गुढीपाडव्यापासून सुरू होतो. या काळात यात्रा-उत्सवांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या तमाशा कार्यक्रमातून फंडांचा वर्षभराचा खर्च भागवला जातो.
परंतु कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गावोगावच्या यात्रा-उत्सवांना प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यामुळे तमाशाचा संपूर्ण हंगाम बुडाला. परिणामी तमाशाचे फड, त्यात काम करणारे कलावंत त्यांचे कुटुंबीय आदींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर उपासमारीचे संकट उभे राहिल्याचे चित्र आहे.





