चित्रा वाघांचा सुषमा अंधारे-अनिल परबांवर हल्लाबोल: ‘लायकीप्रमाणेच बोलतात, ठेचेन पुन्हा’

मुंबई- विधान परिषदेतील वादानंतर भाजप आमदार चित्रा वाघ यांनी शिवसेना (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे आणि आमदार अनिल परब यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. “ज्याची जशी लायकी, तसाच विचार तो करतो. सुषमा अंधारे यांनी जे बोलल्या, त्यात त्यांची चूक नाही, त्यांची तेवढीच लायकीच आहे,” असे चित्रा वाघ म्हणाल्या. “१७५६ आणि तुमच्यासारखे ५६ नीच पुरुषांना मी रोज पायाला बांधून फिरते. मी जे बोलले, त्याचा मला अभिमान आहे,” असे त्या पुढे म्हणाल्या. “आज ठेचले, पुन्हा नादी लागलात तर पुन्हा ठेचेन,” असा इशारा त्यांनी अनिल परब यांना दिला.
सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर –
सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केल्याच्या विचारलेल्या प्रश्नावर वाघ म्हणाल्या, “तुमचा नवरा तुमच्याच मुलाची डीएनए टेस्ट का मागतो? हे उत्तर द्या.” नाव न घेता त्यांनी अंधारेंना हे आव्हान दिले. “सुषमा यांनी माझ्या चारित्र्यावर शेरेबाजी केली. विरोधकांचे जुने नेते थकले, आता हे नवे सुरू झाले. पण माझ्या चारित्र्यावर एकच प्रश्न किती वर्ष विचारणार?” असे सांगत त्यांनी विरोधकांना कोंडीत पकडले.
अनिल परब यांच्यावरही टीका –
विधान परिषदेत अनिल परब यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केल्यानंतर हा वाद पेटला होता. यावर वाघ म्हणाल्या, “परब यांनी माझ्यावर बोट दाखवले, म्हणून मी उत्तर दिले. हा फक्त माझा प्रश्न नाही, तर महिलांवर दादागिरी आणि अपमानाचा आहे. महिलांचा आवाज दाबण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही स्वतःला काय समजता? तुमची लायकी काय?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले. “आम्हाला हलक्यात घेऊ नका, हा संदेश देण्यासाठीच मी बोलले,” असेही त्या म्हणाल्या.
‘सटरफटर’ वाल्यांवरही हल्ला
चित्रा वाघ यांनी या वादात उडी घेणाऱ्यांना ‘सटरफटर वाले’ संबोधत टीका केली. “अशा परिस्थितीतून घाणेरडे काहीतरी निर्माण करायचे आणि घाणेरडे बोलायचे, हाच त्यांचा उद्योग आहे,” असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फोडले असून, चित्रा वाघ यांनी आपली भूमिका ठामपणे मांडत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.





