मुंबई : महाराष्ट्र राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे आज शपथ घेणार आहेत. आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री देखील शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थिती असणार आहे. शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली असून देशभरातील अनेक दिग्गज नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. देवेंद्र फडणवीसांवर सध्या कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. अनेक नेते त्यांच्या विजयाचे कौतुक करताना दिसत आहेत. यादरम्यान भाजप नेत्या व विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी विरोधकांना इशारा देत देवेंद्र फडणवीसांसाठी एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी फडणवीसांचे अभिनंदन करत देवाभाऊ का असली पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.. असे म्हणत विरोधकांना इशारा दिला आहे. चित्रा वाघ यांनी काय लिहिले पोस्टमध्ये? मी ‘काडतूस’ आहे…झुकेगा नही ! ‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे घर मत बसा लेना, मै समंदर हूं, वापस आऊंगा’, असं तो म्हणाला, तेव्हा त्याची खिल्ली उडवली गेली… पण आज हा समुद्रासारख्या विशाल अंतःकरणाचा, समुद्राएवढ्या कर्तृत्वाचा, समुद्राइतकी वैचारिक खोली असणारा देवाभाऊ परत आलाय. ‘आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, आम्ही चक्रव्यूह भेदणं जाणतो’, असं हा आधुनिक अभिमन्यू म्हणाला, तेव्हा त्याची चेष्टा झाली, पण त्यानं कावेबाजांचा, कुटिल कारस्थानांचा चक्रव्यूह भेदला. असा काही भेदला, की त्यातून उडालेल्या तेजाच्या किरणांनी भल्याभल्यांचे डोळे दीपून गेले. कुरुक्षेत्रावरचं युद्ध खूप जटिल, अवघड असणार आहे, हे या अभिमन्यूला माहीत आहे…. पण त्याला कर्तृत्वाची कवचकुंडलं मिळाली आहेत. ती घेऊन सर्वशक्तिनिशी तो परत आलाय. ‘मी पुन्हा येईन’ असं देवाभाऊ म्हणाला, तेव्हा त्याच्याविरुद्ध पाच वर्षं सातत्यानं कटकारस्थानांचे डोंगर रचले गेले; पण तो परत आलाय!!! परत आलाय गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. ‘देवाभाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है’ असं म्हणणारा देवाभाऊ पाच वर्षांआधी जे बोलला, ते त्यानं करून दाखवलंय दोस्तों… आणि जे नाही बोलला, ते ‘डेफिनेटली’ करण्यासाठी आता परत आलाय. ‘फडतूस नाही, काडतूस आहे. झुकेगा नही घुसेगा साला’ असं तो म्हणाला होता. येस्स. या देवाभाऊनं ‘फडतूस’ लोकांना ‘काडतूस’ बनून पाताळात गाडलं. .. आता ‘झुकण्या’साठी नाही, तर ‘घुसण्या’साठी तो परत आलाय. देवाभाऊचा पाच वर्षांचा मुख्यमंत्रिपदाचा काळ हा महाराष्ट्राच्या विकासाच्या इतिहासातला सगळ्यात सोनेरी कालखंड होता. त्यानंतर अडीच वर्षं तो विरोधी पक्षनेता बनून कुटिल लोकांवर तुटून पडला. पुढची अडीच वर्षं धोरणीपणानं डावपेच आखत राहिला. आता तो परत आलाय. त्याचा पिक्चर संपलेला नाही. उलट त्याचा पिक्चर आता ॲक्शननं भरपूर असणार आहे. त्याच्या पिक्चरचं नाव कुणी तरी ‘अकेला फडणवीस’ असं ठेवलं होतं… पण त्याला चौदा कोटी जनतेनं पुन्हा एकदा ‘हिरो’ बनवलं. येस्स. तमाम महाराष्ट्राचा लाडका, जिगरबाज, चाणक्यनीतीत तरबेज, बहिणांचा पाठिराखा, शेतकऱ्यांचा सच्चा साथी, वंचितांचा खंदा आधार असलेला देवाभाऊ पाच वर्षांसाठी अवतरला आहे. आता तो काय करतो ते बघाच…. देवाभाऊ का असली पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त… फडणवीसांच्या शपथविधीसाठी आझाद मैदान सज्ज शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानावर तीन व्यासपीठं उरण्यात आली आहेत. मुख्य व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची आसनव्यवस्था असणार आहे. आझाद मैदानात पालिका प्रशासनाकडून सेवा- सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत, मैदानाच्या आजूबाजूच्या रस्त्यांची डागडुजी, वाहतूक चिन्हे आणि रेषांची रंगरंगोटी मुंबई महापालिकेकडून करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला आहे.