वाल्हे : निसर्गरम्य वातावरणातील विविध झाडे तसेच पक्ष्यांचा किलबिलाट पाहून रयत शिक्षण संस्थेचे वाल्हे (ता. पुरंदर) येथील महर्षी वाल्मिकी विद्यालयातील पाचवी ते आठवीतील विद्यार्थी दंग झाले होते. येथील डोंगरावरील पुरातन सात रांजरण डोंगर व शिवकालीन भवानीमाता मंदिर परिसराला क्षेत्रभेट अंतर्गत विद्यालयातील 245 विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी विविध झाडांनी बहरलेला डोंगर पाहून विद्यार्थ्यांनी खेळण्याचा व सह्याद्रीच्या डोंगरावर बागडण्याचा मनसोक्त आनंद घेतला. यावेळी शिक्षकांनी विविध उपक्रमांची विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यालयाचे सहशिक्षक संजय निर्मळ व गीतांजली मोरे यांनी येथील निसर्गाच्या विविध वैशिष्ट्यांची माहिती देऊन शिवकालीन भवानी माता मंदिर व सातरांजण डोंगराबाबत विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. यावेळी येथील हिरवळीवर विद्यार्थ्यांचे विविध खेळ घेण्यात आल्याचे प्राचार्य सतिश निगडे यांनी सांगितले.