हॉंगकॉंग्गमध्ये चिनी राष्ट्रध्वज आंदोलकांनी तुडवला

हॉंगकॉंग – हॉंगकॉंगमधील लोकशाहीवादी आंदोलनाने अधिकच उग्र रूप धारण केले असून आज आंदोलकांनी चिनी राष्ट्रध्वज पायदळी तुडवला आणि चिंध्या करून शिंग मून नदीमध्ये फेकून दिला. त्यापूर्वी या ध्वजाला रंगही फासला गेला होता. त्यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या शेकडो नागरिकांनी हर्षोल्हासाने घोषणा दिल्या. हॉंगकॉंगच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या आंदोलकांचा उत्साह वाढवणाऱ्या या घोषणाबाजीमुळे संपूर्ण वातावरण आंदोलनमय बनले होते.

आंदोलनादरम्यान हिंसाचार आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी होऊ नये, म्हणून अधिकाऱ्यांनी दोन भूमिगत रेल्वे स्टेशन बंद केली होती. या स्टेशनच्या आवारात घुसल्यास अश्रुधुराचा वापर केला जाईल, असा इशारा देण्यासाठी पोलिसांनी काळे झेंडे उभे केले होते. आंदोलकांनी बेकायदेशीर जमाव करू नये आणि त्वरित निघून जावे, असा इशराही पोलिसांच्यावतीने देण्यात आला.

जून महिन्यापासून हॉंगकॉंगमध्ये लोकशाहीवादी आंदोलन पेटले आहे. प्रत्यार्पणविरोधी विधेयकाला विरोध करण्यासाठी हे आंदोलन सुरू झाले होते. हे विधेयक आता जरी मागे घेतले गेले असले, तरी अजून आंदोलकांच्या अन्य प्रमुख 4 मागण्या प्रशासनाकडून मान्य झालेल्या नाहीत.

आंदोलन चिरडण्यासाठी चीनकडून बळाचा वापर सुरू केला. मात्र आंतरराष्ट्रीय दबावामुळे चीनला आंदोलनकर्त्यांवर अधिक कठोर कारवाई करता आलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.