बीजिंग – चीनच्या अंतराळ स्थानकावर गेलेले अंतराळवीर आज तेथून पृथ्वीवर परत येणार होते. मात्र अवकाशातील काही अज्ञात वस्तूचा अवकाश स्थानकावर झालेल्या आघातामुळे या अंतराळवीरांचा परतीचा प्रवास लांबणीवर टाकण्यात आला आहे. चायना मॅन्ड स्पेस एजन्सीने आज ही माहिती दिली. अंतराळ स्थानकावरील अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या परतीच्या प्रवासाची योजना लांबणीवर टाकण्यात येत असल्याचे एजन्सीने म्हटले आहे. अंतराळ स्थानकावर असलेल्या अंतराळवीरांना दर ६ महिन्यांनी पृथ्वीवर आणून त्यांच्या जागेवर नवीन अंतराळवीरांना पाठवले जात असते. त्यानुसार ३ अंतराळवीरांना घेऊन शेन्झोउ-२० हे अवकाश यान अंतराळ स्थानकावर पोचले होते. शेन्झोउ-२१ मधील जागेवर नवीन अंतराळवीरांनी आपली जागा घेण्याची प्रक्रिया शनिवारी पूर्ण झाली. हे अंतराळयान बुधवारी सकाळी पृथ्वीवर परत येण्यासाठी निघणार होते. आतापर्यंत, शेन्झोउ-२० अंतराळ यानातील चेन डोंग, चेन झोंगरुई आणि वांग जी या तीन कर्मचाऱ्यांनी त्यांची सर्व नियोजित कामे पूर्ण केली आहेत आणि बुधवारी उत्तर चीनच्या इनर मंगोलिया स्वायत्त प्रदेशातील डोंगफेंग लँडिंग साइटवर परतण्याचे नियोजन केले गेले आहे. आता या तिघांना पृथ्वीवर कधी परत आणले जाईल, याचा कोणताही अंदाज एजन्सीकडून वर्तवण्यात आलेला नाही.