Chinchwad Link Road – पिंपरी-चिंचवड लिंक रोडवरील दुर्गा कॉर्नरजवळील नाल्यालगतच्या पदपथावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. जाहिरातींचे फलक, उभ्या करण्यात आलेल्या गाड्या आणि इतर साहित्यामुळे फुटपाथचा मूळ उद्देशच हरवल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी दिवसभर फुटपाथवर जाहिरातींचे बोर्ड उभे केले जातात. त्यासोबतच अनेक वाहनचालक सर्रासपणे फुटपाथवर वाहने पार्क करत असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याची वेळ येत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीची मोठी वर्दळ असलेल्या लिंक रोडवर पादचाऱ्यांसाठी असलेला फुटपाथच अडविला गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “पदपथ हा चालण्यासाठी आहे की जाहिरातींसाठी?” असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. नाल्यालगतचा हा परिसर अरुंद असल्याने अतिक्रमणामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळी वाहतुकीचा ताण वाढत असताना पादचाऱ्यांना वाहनांच्या मधून मार्ग काढावा लागत आहे. महापालिका आणि वाहतूक विभागाने तातडीने कारवाई करून पदपथावरील अतिक्रमण हटवावे, बेकायदा पार्किंगवर नियंत्रण आणावे आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.