वेलिंग्टन – चीनने आता सोलोमन बेटावर आपली वक्रदृष्टी वळवली असून तेथे आपले लष्करी बस्तान बसवण्याचा प्रयत्न त्यांनी आता हाती घेतला आहे. ही बाब चीनच्या उघड झालेल्या एका गुप्त दस्तऐवजावरून निदर्शनाला आली आहे. त्यामुळे जवळच्या ऑस्ट्रेलिया आणि त्यापलीकडे असणाऱ्या देशांना धोका निर्माण होत आहे.
सोलोमन बेटांच्या प्रशासनाने गुरुवारी स्पष्ट केले की, त्यांनी चीनसोबत लष्करी सुरक्षा सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे. ज्या योगे चीनला त्या बेटावर आपले बस्तान बसवणे शक्य होणार आहे. या करारातील काही गुप्त बाबी यामुळे ऑन लाईन उघड झाल्या आहेत.
मसुदा कराराच्या अटींनुसार, सामाजिक सुव्यवस्था राखण्यासाठी आणि इतर विविध कारणांसाठी चीन सोलोमन बेटावर पोलीस, लष्करी कर्मचारी आणि इतर सशस्त्र दले पाठवू शकतो. ते बेटांवर थांबण्यासाठी आणि त्यांना रसद पुरवण्यासाठी जहाजे देखील पाठवू शकतो. चीनच्या या धोरणामुळे ऑस्ट्रेलियाबरोबरच न्युझीलंड आणि नंतर अमेरिकेला भविष्यात मोठा धोका होऊ शकतो. चीन सोलोमन बेटावर या निमीत्ताने आपले लष्करी तळ विकसित करणार असल्याचा त्यांचा हेतूही यातून उघड झाला आहे.