नवी दिल्ली – चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ९ वरिष्ठ जनरलना संसदेकडून तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले आहे. या वरिष्ठ जनरलमध्ये देशाच्या रॉकेट फोर्समधील ५ विद्यमान किंवा माजी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
हे सर्व पदाधिकारी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि आण्विक युद्धसामुग्रीची हाताळणी करत असायचे. तसेच चीनच्या हवाई दलाच्या माजी कमांडरलाही तडकाफडकी संसदेतून बडतर्फ करण्यात आले आहे, असे चीनमधील सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. चीनच्या राष्ट्रीय संसदीय समितीच्या स्थायी समितीने याबाबतची घोषणा केली आहे. या सर्व वरिष्ठ जनरलना तडकाफडकी बडतर्फ करण्याचे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही.
संसदीय समितीने नौदल कमांडरना संरक्षण मंत्री म्हणून नियुक्त केल्याच्या काही अवधीतच या कमांडरना पदावरून हटवण्यात आले आहे. यातील काही जनरल हे नवनियुक्त संरक्षण मंत्र्यांच्या समकक्ष श्रेणीचे आणि ज्येष्ठतेच्याबाबतीत तितक्याच ज्येष्ठतेचे असल्याच्या कारणास्तव या सर्वांना हटवण्यात आले असावे, असा अंदाज व्यक्त होतो आहे.