ऐकावे ते नवलच! चीनमध्ये चक्क वाघाच्या मूत्राची विक्री, ‘या’ आजारावर प्रभावी औषध असल्याचा दावा

China News | आजारातून बरे होण्यासाठी अनेक उपाय केले जातात. काहीजण घरगुती उपायांचा मार्ग वापरतात, तर काहीजण आयुर्वेदिक-होमिओपॅथी औषधं घेतात. मात्र, चीनमध्ये आजारापासून बरे होण्यासाठी याच्याही पुढचा टप्पा गाठण्यात आला आहे. चीनमध्ये संधिवात आजारापासून सुटका व्हावी यासाठी चक्क वाघाच्या मूत्राचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे या मूत्राची शेकडो रुपयांनी विक्री देखील केली जात आहे.
चीनच्या सिचुआन प्रांतातील याआन बिफेंगक्सिया हे प्राणीसंग्रहालय सध्या चर्चेत आले आहेत. या प्राणीसंग्रहालयाला देश-विदेशातून अनेक लोक भेट देतात. या संग्रहायलयाचा दावा आहे की वाघाच्या मूत्राचा वापर केल्यास संधिवाताचा आजार बरा होतो. संधिवातावरील उपाय म्हणून या प्राणीसंग्रहालयाकडून वाघाच्या मूत्राची विक्री केली जात आहे.
याआन बिफेंगक्सिया प्राणीसंग्रहालय सायबेरियन वाघाचे मूत्र असलेल्या एका बॉटलची जवळपास 600 रुपयांना विक्री करत आहे. या मूत्राचा संधिवात, स्नायूदुखी या आजारांवर चांगला परिणाम होतो, असा दावाही या बाटल्यांवर करण्यात आला आहे. सोबतच, या मूत्राचा कसा वापर करायचा याचीही माहिती दिली आहे.
प्राणीसंग्रहालय लोकांना माहिती देत आहे की, वाघाच्या मूत्रामध्ये व्हाइट वाइन आणि आले टाकावे व त्यानंतर ज्या ठिकाणी वेदना होत आहे, तेथे लावावे. तसेच, हे मूत्र प्राशन देखील करू शकतात. मात्र, कोणत्या प्रकारची अॅलर्जी अथवा त्रास झाल्यास याचा वापर बंद करावा.
प्राणीसंग्रहालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगितले की, वाघाचे मूत्र एका भांड्यात जमा केले जाते. तसेच, सध्या याची फारशी विक्री होत नाही. दिवसाला केवळ एक-दोन बॉटलच ग्राहक खरेदी करतात. तसेच, त्यांच्याकडे वाघाच्या मूत्राची विक्री करण्यासाठी परवाना देखील असल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, अशाप्रकारे वाघाच्या मूत्राची विक्री करत असल्यामुळे हे प्राणीसंग्रहालय चर्चेत आले आहे.





