बीजिंग : चीनच्या नौदलामध्ये फुजियान ही तिसरी विमानवाहू युद्धनौका दाखल झाली आहे. ही अत्यंत आधुनिक युद्धसामुग्रीने सुससज्ज असलेली युद्धनौका इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षमतांनी सज्ज आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या उपस्थितीत अत्यंत गुप्तपणे झालेल्या समारंभात या विमानवाहक युद्धनौकेचे जलावतरण करण्यात आले. चीनच्या दक्षिणेकडील हैनान प्रांतात सान्या बंदरात फुजियान नौकेचा जलावतरण समारंभ शुक्रवारी झाल्याचे अधिकृत माध्यमांनी म्हटले आहे. तर शी जिनपिंग बुधवारी झालेल्या कार्क्रमाला उपस्थित राहिले होते, असे चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. फुजियान ही युद्धनौका इलेक्ट्रोमॅग्नेटिक एअरक्राफ्ट लॉंचिंग सिस्टीम अर्थात इमाल्स यंत्रणेने सुसज्ज आहे. ही यंत्रणा यापुर्वी अमेरिकेच्या यूएसएस गेराल्ड आर फोर्ड युद्धनौकेमध्येच वापरली गेली आहे मात्र इमाल्स यंत्रणेची विश्वासार्हता कमी असून ही यंज्ञणा दुरुस्त करणेही अवघड असल्याने आता इमाल्स यंत्रणा न वापरता पूर्वीची वाफेच्या इंजिनाची यंत्रणा स्वीकारायचा मनोदय ट्रम्प यांनी अलिकडेच व्यक्त केला आहे. फुजियान युद्धनौकेमुळे चीनच्या नौदलामध्ये आता तीन विमानवाहक युद्धनौका तैनात झाल्या आहेत. चीन आता आपली चौथी विमानवाहक युद्धनौका बांधण्यास सुरुवात करत असल्याचेही वृत्त अलिकडेच आले आहे. [लियान येथे बांधणी केली जात असलेली ही युद्धनौका अण्वस्त्रसज्ज असणार आहे. पुर्वी लियाओंगनिंग ही सोव्हिएतकालीन युद्धनौका २०१२ साली नौदलात सामील झाली. त्यानंतर २०१९ साली शांदोंग ही देशांतर्गत बनावटीची युद्धनौका सक्रिय करण्यात आली. जे-१५ टी, जे-३५ टी आणि कोंगजिंग-५०० लढाऊ विमानांसाठी फुजियान युद्धनौका विकसित करण्यात आली आहे. फुजियानचे वजन तब्बल ८० हजार टन इतके आहे. अमेरिकेबरोबरच्या सागरी तणावाचा विचार करून चीन जास्तीत जास्त युद्धनौका जगभरातल्या वेगवेगळ्या सागरी तळांवर सक्रिय करण्याच्या प्रयत्नात असल्याचे निरीक्षकांनी सांगितले.