वाशिंग्टन – अमेरिकेने विविध देशाबरोबर व्यापार युद्ध सुरू केले असून एकतर्फी आयात शुल्क लावले आहे. मात्र चीन अमेरिकेबरोबरचा व्यापार असंतुलित पद्धतीने करत असूनही अमेरिकेने आतापर्यंत चीनविरोधात आयात शुल्काची अंमलबजावणी टाळली आहे. सेमीकंडक्टर संदर्भातही अमेरिकेने चीनसाठी वेगळा न्याय देण्याचे धोरण चालूच ठेवले आहे. प्राप्त माहितीनुसार सेमीकंडक्टर क्षेत्रात चीन अयोग्य व्यापार धोरण राबवतो असा निष्कर्ष अमेरिकेतील चौकशी समितीने काढला आहे. मात्र तरीही चीन विरोधात यासंदर्भात आयात शुल्क लावण्याचा निर्णय आणखी 18 महिन्यांनी घेतला जाणार असल्याचे अमेरिकन प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रात आपली एकाधिकारशाही कायम राहावी यासाठी चीन अयोग्य व्यापार धोरणाचा अवलंब करत असतो असा आरोप अमेरिकेत करण्यात येत होता. त्यानंतर बायडेन प्रशासनाने या आरोपाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल आता उपलब्ध केला असून चीन खरोखरच या क्षेत्रात अयोग्य धोरण स्वीकारतो असे म्हटले आहे. मात्र तरीही अमेरिकेच्या सध्याच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने तातडीने चीन विरोधात आयात शुल्काचा वापर करण्याचे टाळले आहे. उलट या संदर्भातील निर्णयात तब्बल 18 महिन्यानंतर म्हणजे 23 जून 2027 नंतर घेतला जाण्याची शक्यता असल्याचे सध्याच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या चीनच्या सेमीकंडक्टरच्या आयातीवर अमेरिकेत शून्य टक्के आयात शुल्क लागते आणि पुढील 18 महिन्यात तरी हे आयात शुल्क शून्य टक्क्यापेक्षा जास्त होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. 18 महिन्यानंतर या संदर्भात तेव्हाची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाऊ शकेल असे अमेरिकन प्रशासनाने नमूद केले आहे.