बीजिंग : चीनने बुधवारी आपल्या नवीन शस्त्रांना प्रथमच जगासमोर आणले. बीजिंगमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य लष्करी संचलनामध्ये चीनने लेसर शस्त्रे, आण्विक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, अतिविशाल अंडरवॉटर ड्रोन तसेच पाचव्या जनरेशनची लढाऊ विमाने सादर केली. आतापर्यंत पीपल्स लिबरेशन आर्मीच्या या आधुनिक शस्त्रांबाबत केवळ बोलले जात होते. पण ती प्रत्यक्ष्यात कधीच बघितली गेली नव्हती. दुसऱ्या महायुद्धात जपानवर मिळवलेल्या विजयाला ८० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित या संचलनात ही आधुनिक शस्त्रे जगाला दाखवण्याची चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची महत्वाकांक्षा पुर्ण झाली. लेजर वेपनसारख्या या शस्त्रांमुळे सागरी युद्धाचे नियम खरोखरच बदलतील, असे चिनी संरक्षण विश्लेषकांचे म्हणणे आहे. या लेजर प्रणालीची बरोबरी केवळ भारताने गेल्या महिन्यात यशस्वी चाचणी घेतलेल्या एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीकडूनच केली जाऊ शकते. तसेच, चीनने प्रथमच नवीन प्रकारचे डीएफ-५सी द्रव-इंधनयुक्त आंतरखंडीय आण्विक क्षेपणास्त्र प्रदर्शित केले. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता २० हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे. इतक्या लांब अंतरावर देखील अचूक मारक क्षमता ही याची विशेषता आहे. तसेच जेएल-१ या आण्विक वाहक क्षेपणास्त्रालाही प्रथमच जगासमोर आणण्यात आले. जेएल-३ या पाणबुडीवरून मारा करू येण्याच्या क्षेपणास्त्रापेक्षा हे क्षेपणास्त्र लहान आहे. ही दोन क्षेपणास्त्रे तसेच डीएफ-६१ आणि डीएफ-३१ क्षेपणास्त्रांमुळे पीपल्स लिबरेशन आर्मी एकाचवेळी जमिनीवर, हवेत आणि पाण्याखाली देखील सारख्याच क्षमतेने मारा करू शकणार आहे. डीएफ-५ सी क्षेपणास्त्र १० वेगवेगळ्या लक्ष्यांना भेदण्याची क्षमता असलेले आहे. म्हणजेच एकच क्षेपणास्त्र डागल्याने १० लक्ष्यांचा वेध घेता येऊ शकेल. ही क्षेपणास्त्रे आपला मार्ग स्वतःच निश्चित करू शकतील. तसेच रडारला चुकवण्यासाठी मार्ग बदलू देखील शकतील. शत्रूच्या माऱ्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या क्षेपणास्त्रांचा वापर उत्तमप्रकारे केला जाऊ शकतो. रॉकेट फोर्सच्या द्वारे डीएफ-२६ डी हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पारंपारिक आणि अण्वस्त्रांनाही वाहून नेऊ शकणारे आहे. तसेच त्याची मारक क्षमता तब्बल ५ हजार किलोमीटरपर्यंत आहे. याशिवाय जे-२०, जे-२० ए, जे-२० एस, आणि जे-३५ ए यासारख्या आधुनिक स्टील्थ फायटर जेट आणि नौदलासाठीच्या जे-३५ विमानांचेही सादरीकरण या करण्यात आले. सीजे- १००० वाहनावर बसवलेले सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र, वायजे-१८सी जहाजावरून सोडले जाणारे क्रूझ क्षेपणास्त्र आणि वायजे-१५, वायजे-१७, वायजे-१९ आणि वायजे-२० या चार नवीन प्रकारच्या हायपरसोनिक स्ट्राइक क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन देखील करण्यात आले. एचक्यू-२० आणि एचक्यू -२२ ए या विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली आणि एचक्यू-२९ इंटरसेप्टर क्षेपणास्६ंनाही यावेळी सादर केले गेले. चीनने चौथ्या जनरेशनच्या मुख्य युद्ध रणगाड्याचे पहिले मॉडेल देखील प्रदर्शित केले, त्यामध्ये मानवरहित बुर्ज, प्रगत रडार, सक्रिय संरक्षण प्रणाली तसेच ऑगमेंटेड रिऍलिटी तंत्रज्ञान आहे. ९९-बी रणगाडा पहिल्यांदा जगासमोर आणला गेला. हा चीनच्या थर्ड जनरेशन रणगाडा श्रेणीतला सर्वात हलक्या वजनाचा रणगाडा आहे.