बीजिंग – मुक्त व्यापाराचा पुरस्कार करणार्या अमेरिकेने बचवात्मक व्यापार धोरण सुरू करून आयातशुल्क युद्ध सुरू केले आहे. त्या उलट चीनने आपल्या हैनान या विशाल बेटावर मुक्तव्यापार कॉलनी सुरू केली आहे. हे बेट सिंगापूर देशापेक्षा 50 पटीने मोठे तर तैवान देशांएवढे आहे. या बेटावर कोणत्याही कंपन्या आपला माल विनाशुल्क उतरू शकतील. यामध्ये मूल्यवर्धन करून हा माल विनाशुल्क चीनमध्ये निर्यात करू शकतील. या ठिकाणी येणार्या 74% वस्तूवर कसलेही शुल्क लावले जाणार नाही. या बेटावर चीनचे नियम लागू होणार नाहीत तर या बेटाचे स्वतःचे विनाशुल्क कर रचनेचे नियम असतील. दक्षिण चीनमधील या बेटावर अगोदरच घडामोडी सुरू झाल्या आहेत. अमेरिका आणि युरोपला चीनने त्यांच्या धोरणाच्या एकदम उलट निर्णय घेऊन चोख प्रतिउत्तर दिले आहे. या बेटाच्या माध्यमातून जर आयफोन तयार केला तर तो 100 डॉलरने म्हणजे नऊ हजार रुपयानी स्वस्तात पडणार आहे. यावरून या ठिकाणाहून तयार करणार्या वस्तू निर्यातपेठेत किती स्वस्त प्रमाणात जाऊ शकतील याचा अंदाज येतो. चीनने केलेल्या या अभूतपूर्वकृतीमुळे आता जगातील बरेच देश या बेटाच्या माध्यमातून चीनच्या मुख्य बाजारपेठेत विनाशुल्क प्रवेश करू शकणार आहेत. चीनमध्ये अगोदरच 22 मुक्त व्यापार केंद्र आहेत. मात्र हैनान त्यापेक्षा वेगळे असणार आहे. या ठिकाणी एकात्मिक मुक्त व्यापार बंदर असेल. चीनमधील व्यापार विषयक आणि करविषयक नियम या बंदरावर लागू होणार नाहीत. चीनने घेतलेला या निर्णयानंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांचे पाय तिकडे वळत आहेत. सिमेन्स एनर्जी कंपनीने या ठिकाणी आपल्या प्रकल्पासाठी बांधकाम सुरू केले आहे. 2020 पासून या बेटावर 176 देशातील शेकडो कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. या प्रक्रियेला आता नव्या नियमामुळे वेग येणार आहे.