China-Taiwan Tension: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावरून परतताच चीनने तैवानभोवतीची आक्रमक रणनीती अधिक तीव्र केली असून, आशियातील वादग्रस्त समुद्री भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू केल्या आहेत. युद्ध न छेडता तैवानवर दबाव निर्माण करण्यासाठी चीन ‘ग्रे-झोन’ रणनीतीचा वापर करत असल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या अहवालांत म्हटले आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ आणि ‘तैवान न्यूज’च्या वृत्तानुसार, चीनने वादग्रस्त समुद्री क्षेत्रांत मोठ्या संख्येने मासेमारी नौका, कोस्ट गार्ड जहाजे आणि विशेष सागरी सुरक्षा पथके तैनात केली आहेत. या माध्यमातून चीनला प्रत्यक्ष युद्ध टाळत समुद्री भागांवरील आपला प्रभाव मजबूत करायचा असल्याचे मानले जात आहे. अहवालानुसार, अलीकडेच सुमारे २०० चिनी मासेमारी नौका यलो सी परिसरात दिसून आल्या. हा भाग चीन आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांच्या दाव्यातील संवेदनशील समुद्री क्षेत्र मानला जातो. जिओस्पेशियल इंटेलिजन्स कंपनी ‘इंजेनिस्पेस’च्या माहितीनुसार, महत्त्वाच्या शिपिंग मार्गांवर आणि वादग्रस्त समुद्री पट्ट्यांमध्ये चिनी जहाजांची उपस्थिती लक्षणीयरीत्या वाढली आहे. ‘ग्रे-झोन’ रणनीतीवर भर – तज्ज्ञांच्या मते, चीन आता ‘ग्रे-झोन’ तंत्राचा अधिक आक्रमक वापर करत आहे. या रणनीतीत थेट युद्ध न करता टप्प्याटप्प्याने भू-राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. चीन सामान्य मासेमारी नौकांचाही रणनीतिक वापर करत असून, गरज पडल्यास त्यांचा इतर सागरी मोहिमांसाठी वापर होऊ शकतो. इंजेनिस्पेसचे अधिकारी जेसन वांग यांनी सांगितले की, चीन या जहाजांच्या माध्यमातून वादग्रस्त समुद्री भागांवरील नियंत्रण मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्यात तणाव वाढल्यास आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. पूर्व चीन समुद्रात एका वेळी ६०० हून अधिक चिनी मासेमारी नौका एका रेषेत आढळल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याच काळात चीनने दियाओयुताई बेटांभोवती कोस्ट गार्डची गस्त वाढवली होती. दक्षिण चीन समुद्रातही हालचाली – दक्षिण चीन समुद्रातील स्कारबोरो शोल आणि पॅरासेल बेटांजवळ चीनकडून नव्या बांधकाम हालचाली सुरू असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. या माध्यमातून चीन संपूर्ण प्रदेशात आपला प्रभाव अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ट्रम्प-शी जिनपिंग यांच्यात तैवान मुद्द्यावर चर्चा – दरम्यान, चीन दौऱ्यावर असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यात तैवान प्रश्नावर सविस्तर चर्चा झाल्याचे समोर आले आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेत परतल्यानंतर माध्यमांशी बोलताना, “शी जिनपिंग तैवानमध्ये स्वातंत्र्यलढ्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, याबाबत ठाम आहेत. कारण त्यातून मोठा संघर्ष निर्माण होऊ शकतो,” असे सांगितले. चीन तैवानला आपल्या भूभागाचा हिस्सा मानतो, तर तैवान स्वतःला स्वतंत्र लोकशाही राष्ट्र मानतो. तैवान प्रश्नासोबतच व्यापार, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर सुरक्षा, इराण आणि अण्वस्त्र नियंत्रण यांसारख्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे वृत्त आहे. चीन-तैवान वाद नेमका काय? चीन आणि तैवान यांच्यातील वाद हा मुख्यतः “तैवान स्वतंत्र देश आहे की चीनचा भाग?” यावरून आहे. हा वाद अनेक दशकांपासून सुरू असून, त्यामागे इतिहास, राजकारण आणि सामरिक हितसंबंध आहेत. वादाची पार्श्वभूमी – १९४९ मध्ये चीनमध्ये यादवी युद्ध झाले. यात चिनी कम्युनिस्ट पक्ष चे नेते माओ झेडोंग विजयी झाले आणि त्यांनी मुख्य भूमीवर ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ स्थापन केले. तर पराभूत राष्ट्रवादी पक्षाचे नेते चियांग कायी शेक तैवानमध्ये गेले आणि तेथे स्वतंत्र सरकार चालवू लागले. तेव्हापासून तैवानचे स्वतःचे सरकार, सैन्य, चलन आणि लोकशाही व्यवस्था आहे. चीनची भूमिका- चिन तैवानला आपल्या देशाचा अविभाज्य भाग मानतो. चीनचे म्हणणे आहे की, भविष्यात तैवानचे “पुनर्एकत्रीकरण” झालेच पाहिजे. गरज पडल्यास शक्ती वापरण्याचाही इशारा चीन वेळोवेळी देतो. तैवानची भूमिका – तैवानमधील अनेक लोक स्वतःला स्वतंत्र ओळख असलेले मानतात. तिथे लोकशाही पद्धतीने निवडणुका होतात आणि स्वतंत्र प्रशासन चालते. मात्र तैवानने अधिकृतपणे “स्वतंत्र राष्ट्र” घोषित केलेले नाही, कारण त्यामुळे चीनकडून लष्करी कारवाईचा धोका वाढू शकतो. अमेरिकेची भूमिका – अमेरिका अधिकृतपणे “वन चायना पॉलिसी” मान्य करतो, म्हणजेच चीनला मान्यता देतो. पण त्याचवेळी अमेरिका तैवानला शस्त्रे आणि संरक्षणात्मक मदतही पुरवते. त्यामुळे चीन-अमेरिका संबंधांत तैवान हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. तैवान इतका महत्त्वाचा का? तैवान जगातील अत्यंत महत्त्वाचा सेमिकंडक्टर (चिप) उत्पादक आहे. आशियातील महत्त्वाच्या समुद्री व्यापार मार्गाजवळ त्याचे स्थान आहे. तैवानवर नियंत्रण मिळाल्यास चीनची सामरिक ताकद मोठ्या प्रमाणात वाढू शकते. सध्याची परिस्थिती – चिन गेल्या काही वर्षांत तैवानभोवती लष्करी सराव, युद्धनौकांची गस्त आणि हवाई हालचाली वाढवत आहे. दुसरीकडे तैवान अमेरिका व इतर मित्रदेशांसोबत संरक्षण सहकार्य वाढवत आहे. त्यामुळे या प्रदेशातील तणाव कायम आहे.