China Earthquake : चीनमध्ये 5.1 रिश्टरचा भूकंप; नेपाळमध्ये पुन्हा महापुराचा इशारा
China Earthquake : चीनच्या सिचुआनमध्ये 5.1 रिश्टरचा भूकंप झाल्यानंतर नेपाळमध्ये पुन्हा पुराचा इशारा देण्यात आला आहे. त्रिशूली परिसरातून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले जात आहे.

China Earthquake : चीनच्या सिचुआन प्रांताला शुक्रवारी 5.1 रिश्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपानंतर नेपाळमध्ये पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला असून, त्रिशूली परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वरच्या भागातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येत असल्याने त्रिशूली नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
चीनच्या भूकंप नेटवर्क केंद्राच्या माहितीनुसार, नैऋत्य चीनमधील सिचुआन प्रांतातील लोंगचांग शहरात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या घटनेची माहिती CGTNच्या हवाल्याने वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे.
दरम्यान, तिबेटच्या बाजूला असलेला धरणाचा भाग पुन्हा फुटल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे त्रिशूली नदीकाठच्या भागात नव्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षा कर्मचारी, बचाव पथके आणि नागरिकांनी तातडीने सतर्क राहावे, सुरक्षित ठिकाणी जावे तसेच इतरांनाही याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन नेपाळ पोलिसांनी केले आहे.
Alert !! pic.twitter.com/grYxhc5N7Q
— Nepal Police (@NepalPoliceHQ) August 28, 2026
फ्लॅश फ्लडमधील मृतांचा आकडा 538च्या वर –
नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडमध्ये मृतांचा आकडा शुक्रवारी 538च्या वर पोहोचला. या दुर्घटनेत 1,545 जण जखमी झाले असून त्यांची सुटका करण्यात आली आहे.
नेपाळ पोलिसांच्या माहितीनुसार, चितवन जिल्ह्यात सर्वाधिक 178 मृतदेह सापडले आहेत. त्यानंतर एनपी ईस्टमध्ये 110, गोरखामध्ये 44, नुवाकोटमध्ये 37, धाडिंगमध्ये 33, तनहूनमध्ये 28, एनपी वेस्टमध्ये 27 आणि रसुवामध्ये 12 मृतदेह आढळले आहेत.
नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खानाल यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅश फ्लडनंतर जवळपास 300 भारतीय पर्यटक बेपत्ता असल्याची माहिती होती. मात्र, नेपाळ पर्यटन मंडळाच्या ताज्या माहितीनुसार 178 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. नेपाळमध्ये एकूण 826 आणि तिबेटमध्ये 558 जण बेपत्ता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
परदेशी बचाव पथकांना नेपाळचा नकार –
बचाव आणि शोधमोहीमेसाठी विविध देशांनी पथके पाठविण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, नेपाळने सध्या परदेशी बचाव पथकांची मदत नाकारली आहे. देशातील सुरक्षा यंत्रणा बचावकार्य हाताळण्यास सक्षम असल्याचे सरकारने स्पष्ट केले.
भारत, चीन, अमेरिका, ब्रिटन, जपान, दक्षिण कोरिया, श्रीलंका आणि बांगलादेश यांनी नेपाळला शोध व बचाव पथके पाठविण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लोक बहादूर छेत्री यांनी, सध्या अशा मदतीची आवश्यकता नसल्याचे सांगितले. नेपाळचे लष्कर, पोलीस आणि अन्य स्थानिक यंत्रणा बचावकार्य करत आहेत.
हिमनदी कोसळल्याने महापुराची स्थिती?
अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेच्या (USGS) प्राथमिक माहितीनुसार, हिमनदी कोसळणे आणि त्यातून निर्माण झालेल्या ढिगाऱ्याच्या प्रवाहामुळे भूकंपीय हालचाल झाली आणि नेपाळ व तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंसक परिणाम झाले. सुरुवातीच्या अहवालांमध्ये भूकंपामुळे हिमस्खलन होऊन पूर आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, नंतर USGSने भूकंपीय हालचाली हिमनदी कोसळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट केले.





