पळसदेव – पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी देवकर (ता. इंदापूर) येथील उड्डाण पुलावर शिवशाही बसने तीन वर्षीय चिमुकीला धडक दिल्याने ती जागीच ठार झाली. ही घटना मंगळवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. रिया प्रेमकुमार गौतम (वय तीन वर्षे) असे या चिमुरडीचे नाव आहे. शिवशाही बस (एमएच 09 व्हीएम 9218) ही मंगळवारी सकाळी 8.30 वाजता लोणी देवकर येथील उड्डाणपुलावर आल्यानंतर रिया रस्ता ओलांडून जात असताना सुसाट आलेल्या शिवशाही बसने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. लोणी देवकर एमआयडीसी कंपनीत काम करणाऱ्या बिहार वरून आलेल्या प्रेमकुमार गौतम यांची रिया ही त्यांची एकुलती एक मुलगी होती. या अपघातानंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी काहीवेळ पुणे-सोलापूर महामार्ग रोखून धरला. त्यामुळे महामार्गावरती वाहनांच्या रांगा लागल्या. यावेळी इंदापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर पवार, महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित अभंग यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना शांत केले. त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी लोणी देवकर येथे दोन्ही बाजूने एसटी बसथांबा असतानाही एसटी बसेस येथे न थांबता सुसाट वेगाने मुख्य महामार्गने निघून जातात. त्यामुळे नागरिकांना बसची वाट पाहत महामार्गावरच थांबावे लागते. वास्तविक पाहता यापूर्वीही येथील नागरिकांनी सेवा रस्त्याने बस जात नाहीत. याबाबत तक्रार दिली होती. मात्र, यावर कसलीही कार्यवाही न झाल्याने आज एक चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला, असा आरोप ग्रामस्थांनी केला. सेवा रस्त्याने बसची वाहतूक करण्याची मागणी सेवा रस्त्याने दुतर्फा बाजूने एसटी बसेससाठी थांबा असतानाही येथे बस न थांबता सुसाट वेगाने मुख्य महामार्गने जात असल्याने येथील प्रवाशांना व शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना मागमार्ग उंच असल्याने वर चढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकवेळा ज्येष्ठ नागरिक मुख्य रस्त्यावर येतानाच पडून जखमी देखील झाले आहेत. तरी याबाबत एसटी प्रशासनाने तातडीने दाखल घेऊन सेवा रस्त्याने बसची वाहतूक करण्याची करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.