नवी दिल्ली – गेल्या काही काळापासून भारत आणि मालदीव यांच्या राजकीय संबंधांत चांगलीच कटुता निर्माण झाली असताना भारताला कुटनीतीच्या दृष्टीकोनातून विचार करता चांगले यश मिळताना दिसते आहे. त्याचे कारण म्हणजे मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाने भारतीय पायलटना मालदीवमध्ये हेलिकॉपर उडविण्याची परवानगी दिली आहे. मालदीवच्या या निर्णयामुळे चीनचा जळफळाट होण्याची शक्यता वाढली आहे. त्याचे कारण भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध संपुष्टात आणण्याचा त्या देशाकडून प्रयत्न सुरू असताना त्यांच्या दृष्टीने ही अनपेक्षित घडामोड घडली आहे. मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारताकडून मालदीवला देण्यात आलेले हेलिकॉप्टर ऑपरेट करण्यासाठी भारतीय नागरिकांचा एक समूह मालदीवला येतो आहे. आणीबाणीच्या आरोग्य सुविधांसाठी हे हेलिकॉप्टर भारताने मालदीवला दिले होते. मात्र त्याचा वापर थांबवल्याच्याच मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांत मालदीवमधील विरोधी पक्षांनी मुइज्जू सरकारला धारेवर धरले होते. भारतातील एका आघाडीच्या इंग्रजी माध्यमाने दिलेल्या बातमीनुसार भारतीय नागरिकांची मालदीवमधील उपस्थिती उल्लेखनीय मानली जाते आहे. त्याचे कारण सामरिक दृष्ट्या मालदीव भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे. कुटनीतीच्या संदर्भात हिंद महासागरला भारताचे बॅक यार्ड मानले जाते आणि मालदीव तेथेच वसलेले आहे. चीनसमर्थक मानले जाणारे मुइज्जु सत्तेत आल्यानंतर त्यांनी भारतविरोधी पाउले टाकण्यास सुरूवात केली होती आणि चीननेही त्यांना गोंजारण्याचे काम केले. मात्र भारताला डावलणे त्यांच्यासाठी इतके सोपे नाही कारण मालदीवमधील बहुतांश वर्गाचा भारताच्या मैत्रीला पाठिंबा आहे. आता मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार हेलिकॉप्टर ऑपरेट करण्यासाठी भारतीय पायलट मालदीवच्या अड्डू शहरात येतील आणि भारतीय नागरिकच ते हेलिकॉप्टर चालवणार आहेत. दुसरीकडे भारताने मालदीवसाठीच्या आपल्या बजेटमध्येही वाढ केली आहे. २०२४-२५ साठी भारताने मालदीवसाठी ६ अब्ज रूपयांची तरतूद केली होती. मात्र त्यात वाढ करून नंतर ती ७.८ अब्ज करण्यात आली.