पुणे | बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याने मुलांच्या शिक्षणावरही परिणाम

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जुन्नर तालुक्यात मानव आणि बिबट्या यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे गावकऱ्यांनी त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेचे पुनर्मूल्यांकन केले आहे. काहीजण आपल्या मुलांना शाळेत एकटे पाठवण्याऐवजी घरी ठेवण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ लागला असून, गावातील साक्षरतेचे प्रमाण कमी होऊ शकते, अशी भीती तेथील ग्रामस्थांना वाटू लागली आहे.
जुन्नरमध्ये सध्या सुरू असलेल्या मानव- बिबट्या संघर्षामुळे रहिवाशांना जीवनशैलीत लक्षणीय सुधारणा करणे आणि धोके कमी करण्यासाठी सुरक्षा उपायांना प्राधान्य देणे भाग पडले आहे. कारण आता हे हल्ले केवळ रात्रीच नव्हे, तर दिवसा ढवळ्या होऊ लागले आहेत.
यापूर्वी फक्त रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळेत हल्ले झाले गेले; परंतु आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. अलीकडील अनेक हल्ले दिवसाढवळ्या घडले आहेत आणि बळी प्रामुख्याने मुले आणि वृद्ध आहेत, अशी माहिती तेथील रहिवाशांनी दिली.
पूर्वी मुले गावात, अंगणात मुक्तपणे खेळू शकत होती. वृद्ध व्यक्ती रस्त्यांवरून हिंडूफिरू शकत होती, मात्र आता या परिस्थितीत लोक त्यांच्या मुलांना एकटे सोडायला तयार नाहीत. मुले समोरच्या अंगणात खेळत असली, तरीही मुलांना खाली सोडणे पालकांना जिकिरीचे वाटत आहे.
बिबट्याच्या हल्ल्यामुळे लोकांमध्ये सतत भीतीचे वातावरण आहे. जुन्नरमधील बहुतांश गावांमध्ये रात्रीच्या वेळीच वीज येते. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच शेतात पिकांना पाणी द्यायला जावे लागते, अशी माहिती उंब्रज गावातील पंचायतीचे प्रमुख हनुमंत शिंगोटे यांनी दिली.
या रहिवाशांना जीवनशैलीमध्ये बदल करणे आणि कुटुंबाला सुरक्षा देणे प्राधान्याचे वाटू लागले आहे. त्यामुळे शेतात जाणे त्यांना धोक्याचे वाटत असल्याचा परिणाम शेतीवरही झाला असून. कोबी, टोमॅटो आदी फळे, भाजीपाला शेतातच सुकून जात आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे. बिबट्यांचा वावर केवळ शेत, जंगल भागापुरताच राहिला नसून, तो आता वस्तीभागातही वाढला आहे, हेच या सर्वामागचे कारण आहे.
खबरदारी म्हणून वनविभागाचे अधिकारी, तसेच नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम करणाऱ्या वन्यजीव एसओएसच्या सदस्यांच्या सूचनांनुसार ग्रामस्थ विविध उपाययोजना करत आहेत. जुन्नर भागातील लोक पिढ्यानपिढ्या बिबट्यांसोबत राहतात आणि जागा वाटून घेतात आणि बिबट्या आणि मानव यांच्यातील संवाद साधतात, अशी माहिती माणिकडोह बिबट्या बचाव केंद्राचे व्यवस्थापक महेंद्र ढोरे म्हणाले.
येथील लोकांना हे समजले आहे, की या बिबट्यांसोबत एकत्र राहावे लागेल; परंतु त्यांना अशी अनपेक्षित परिस्थिती टाळण्यासाठी काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. व्यापक कार्यशाळा आणि जागरूकता सत्रांमुळे येथे राहणाऱ्या मानवांच्या जीवनात लक्षणीय बदल झाले आहेत, असे ढोरे म्हणाले.
येथे सुमारे १० किलोमीटर परिसरात किमान १०-१५ बिबट्या फिरत असतात. गुरांना बिबट्यापासून वाचवण्यासाठी गावातील रहिवाशांनी आता त्यांच्या पाळीव प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी शेड तयार केले आहेत. स्थानिकांनी कुत्र्यांसाठीही छोटी घरे बांधली आहे. याआधी असे कधीच केले जात नव्हते, असे येथील नागरिक सांगतात.
परिसरात गटागटाने भ्रमंती
जेव्हा लोक सकाळी किंवा जेवणानंतर बाहेर फिरायला जातात, तेव्हा ते नेहमी चार किंवा पाच लोकांच्या गटात फिरतात आणि खबरदारीचा उपाय म्हणून हातात काठी किंवा टॉर्च घेऊन जातात. मोठा गट असेल तर बिबट्या मोठ्या गटाकडे जाणार नाही, असे नागरिकांना वाटते.
जुन्नर, जिथे मानवी जीवन धोक्यात आले आहे, त्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. बिबट्याच्या उपस्थितीमुळे आणि हल्ल्यांमुळे मानवी जीवनावर कसा परिणाम होतो, याबद्दल अनेक अहवाल आहेत. जुन्नरच्या बाबतीत उसाच्या शेतांनी बिबट्यांचे संरक्षण केले आहे, शिवाय त्यांच्यासाठी कोणताही शिकारी नसल्याने प्रजनन संख्याही मोठी आहे. आदित्य परांजपे, वन्यजीव वॉर्डन, पुणे वन विभाग





