Wagahpur : समस्त ग्रामस्थ आंबळे, जनसेवा प्रतिष्ठान आंबळे व पंचवेद वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र देहु यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आठ दिवसीय भारतीय संस्कृती संस्कार शिबिराचा उत्साहात समारोप संपन्न झाला. दि. 14 मे रोजी सुरू झालेल्या या शिबिराची सांगता दि. 22 मे रोजी संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज ह.भ.प. शिवचैतन्य महाराज मोरे देहुकर, ह.भ.प. भगवान महाराज जाधव तसेच कीर्तनकार ह.भ.प. कृष्णा महाराज पैठणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या संस्कार शिबिरामध्ये आंबळे गावातील सुमारे 80 मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिबिरात मुलांना वारकरी संप्रदायाची ओळख, हरिपाठ, भजन, कीर्तन तसेच भारतीय हिंदू संस्कृतीचे महत्त्व आणि श्रेष्ठत्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हरिपाठ, श्रीमद्भगवद्गीता पाठ, हनुमान चालीसा पाठ, विश्वप्रार्थना, पसायदान, अभंग, गवळणी, शास्त्रातील सदविचार तसेच वारकरी संप्रदायातील संस्कारांचे मोल याबाबत सखोल मार्गदर्शन मिळाले. समारोप प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ह.भ.प. शिवचैतन्य महाराज मोरे देहुकर म्हणाले, “मुलांना संतांचे ज्ञान, शस्त्रांचे ज्ञान आणि देशी खेळांचे महत्त्व समजले पाहिजे. तसेच जीवनातील सर्वात मोठे कार्य म्हणजे खरा माणूस होणे हे साध्य झाले पाहिजे.” ह.भ.प. भगवान महाराज जाधव यांनी आपल्या मनोगतात, “किंमत वयाला नसते, किंमत वागण्याला असते,” असे सांगत मुलांना संस्कारांचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमास उपसरपंच अजित जगताप,ग्रामविकास फाऊंडेशनचे राजेंद्र दरेकर,भगवान दरेकर,दिलीप जगताप तसेच जनसेवा प्रतिष्ठानचे सहकारी व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अजित जगताप यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.