पुणे (संजय कडू) – पूर्वी किंवा आताही एका ठराविक वयोगटातील नागरिक रोजीरोटीसाठी पुणे गाठत असतात. पण, आता फक्त मोबाइलला लागणाऱ्या पैशांसाठी अनेक अल्पवयीन मुले घर सोडून थेट पुण्याचा रस्ता धरत आहेत. हे धक्कादायक निरीक्षण पुणे रेल्वे स्थानकावर लहान मुलांसाठी काम करणाऱ्या “साथी’ संस्थेने नोंदवले आहे. बऱ्याचदा अडचणी येतात. त्यामुळे काही मुलांचा मुक्काम हा संस्थेकडेच असतो. त्यावेळी समुदेशनातून मार्ग शोधला जातो. घर सोडण्याची कारणे काय..? “साथी’ ही संस्था पुणे स्थानकावर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, पोलीस आणि प्रशासनाशी समन्वय ठेऊन कार्यरत आहेत. घर सोडून पुणे गाठलेली सरासरी 250 ते 300 मुले दरवर्षी सापडतात. या मुलांचे समुपदेशन करुन त्यांना पालकांपर्यत पोहचवण्याचे काम ही संस्था करते. हे स्वयंसेवक 24 तास कार्यरत असतात. पळून आलेल्या मुलांमध्ये आजवर आई-वडिलांची मारहाण, घरची परिस्थिती, नापास होणे आणि शहराचे आकर्षण, तर मुलींमध्ये प्रेमप्रकरणाची कारणे आढळायची. मात्र, लॉकडाऊननंतर काही मुलांच्या समुपदेशनादरम्यान ती मोबाइल आणि गॅजेट्सच्या आकर्षणातून आल्याचे निरीक्षण संस्थेने मांडले आहे. यामध्ये 7 ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. माहिती मिळवण्याचे आव्हान या मुलांचे समुपदेशन करुन त्यांच्याकडून घरचा पत्ता आणि फोन नंबर मिळवणे कठीण असते. अनेक मुले महिनोंमहिने माहिती देत नाहीत. तर, काही आक्रमक होऊन अंगावर धाऊनही येतात. अनेकदा त्याना फक्त गावाचे नाव माहिती असते. राज्य, जिल्हा, फोननंबर काहीही सांगता येत नाही. एखादा मूकबधिर असेल, तर सगळेच अशक्यच होऊन बसते. संस्थेची महत्त्चाची निरीक्षणे “रेल्वे स्थानकावर सापडणाऱ्या मुलांमध्ये एखाद-दुसराच मुलगा खरोखर हरवलेला असतो. 99 टक्के मुले स्वत:हून पळालेली असतात. यामध्ये मुलींचे प्रमाण कमी असते. पूर्वोत्तर राज्यांतील मुले एकमेकांच्या ओळखीने काम शोधत येतात. पळून येणाऱ्यांमध्ये उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि नेपाळी मुलांचा समावेश असतो. तर राज्यातून बीड, उस्मानाबाद, आकुर्डी, निगडी, हडपसर येथील मुलांचा समावेश दिसतो. मुले रेल्वेने पळून येण्यामागे महत्वाचे कारण म्हणजे त्यांना तिकीट कोण विचारत नाही. तसेच त्यांना रेल्वेत प्रवेश करण्यास आणि बाहेर पडण्यास अनेक मार्ग असतात. बसमध्ये मात्र तिकीट नसेल तर कंडक्टरच्या लगेचच लक्षात येते. सहज रोजगार मिळत असल्याने ही मुले हॉटेलमध्ये कामासाठीही येतात. तर, काही एजंट अशा मुलांना हेरुन नाशिक आणि यवतमाळ येथे द्राक्ष बागांमध्ये कामासाठी नेतात,’ असे “साथी’ संस्थेचे स्वयंसेवक राजवीर सिंग आणि अमृता तांबे यांनी सांगितले. अन् केजरीवालांचा चेहरा दिसताच हसू उमटले एक मूकबधिर मुलगा पुणे स्थानकावर सापडला. समुपदेशनासाठी “साइन लॅंग्वेज’ तज्ज्ञास बोलावण्यात आले. मात्र, मुलाला ती भाषाही समजत नव्हती. यात सहा महिने गेले. एकदा टीव्हीवर अरविंद केजरीवाल दिसताच मुलगा आनंदाने उड्या मारू लागला. त्यामुळे त्याचा दिल्लीशी काहीतरी संबंध असेल, असा अंदाज स्वयंसेवकांनी बांधला. त्यांनी दिल्लीतील अनेक फोटो मुलाला दाखवले. यातील एका दुकानाचा फोटो मुलाने ओळखला. सुदैवाने दुकानाच्या बोर्डावर फोननंबर होता. यावर “साथी’ संस्थेच्या स्वयंसेवकांनी संपर्क साधताच दुकानदाराने तेथून एक मूकबधिर मुलगा हरवल्याचे सांगितले. तसेच त्याच्या पालकांचा फोननंबरही मिळवून दिला. पुढे आम्ही संपर्क साधला’ असा अनुभव स्वयंसेवकांनी सांगितला.