Crime News : अल्पवयीन मुलीचा बालविवाह; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Crime News : त्यानंतर नवऱ्यामुलानेही ती अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्याशी वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिली.

लोणंद : फलटण तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर दि. १४ ऑगस्ट रोजी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिची प्रसूती झाली असून तिने एका मुलाला जन्म दिला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ सप्टेंबर २०२५ ते १४ ऑगस्ट २०२६ हा प्रकार घडला. संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्या इच्छेविरुद्ध तिचा विवाह लावून देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर नवऱ्यामुलानेही ती अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्याशी वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिली.
दि. १४ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १०.१० वाजता सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिची सिझेरियनद्वारे प्रसूती झाली. त्यानंतर वैद्यकीय तपासणी व एमएलसी जबाबाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी पाचजणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम 64(2)(m), 3(5), बालविवाह प्रतिबंधक अधिनियमातील कलम 9, 11 तसेच पोक्सो अधिनियमातील कलम 4, 6, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पूर्वीच्या भारतीय दंड विधानातील कलम 376(2)(N), 34 तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम व पोक्सो अधिनियमातील संबंधित कलमांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
लोणंद पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हेगडे तपास करीत आहेत. आरोपींच्या अटकेची कार्यवाही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच फलटण विभागाचे उपअधीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी रात्री १०.१६ वाजता घटनास्थळी भेट दिली. लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.





