Child Marriage Case – एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार देणारा तक्रारदारच स्वतः आरोपी निघाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी तपास केला असता, अपहरणाऐवजी बालविवाहाचा गंभीर प्रकार उघड झाला असून, पोलिसांनी फिर्यादीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथील अशोक रायघोळ यांनी त्यांच्या साडूच्या अल्पवयीन मुलीचे प्रवीण कांबळे याने अपहरण केल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. या तक्रारीनंतर पोलीस हवालदार बापू हाडगळे यांनी तपास चक्रे फिरवून मुलगी आणि आरोपी प्रवीण कांबळे यांचा शोध घेतला. मात्र, पोलिसांनी मुलीकडे चौकशी केली असता तिने धक्कादायक खुलासा केला. तिने सांगितले की, प्रवीणने तिचे अपहरण केलेले नसून, घरच्यांच्या त्रासाला कंटाळून ती त्याच्यासोबत गेली होती. तसेच, तिचे मामा आणि काका यांनी यापूर्वीच तिचे एका नात्यातील मुलाशी बळजबरीने लग्न लावून दिले असल्याचे तिने जबाबाने नमूद केले. मुलीच्या या जबाबामुळे पोलीस चक्रावून गेले आणि अपहरणाची तक्रार करणाराच बालविवाहाच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत प्रवीण परमेश्वर कांबळे, वैभव गंगाधर खिलारे, अशोक चांदू रायघोळ, पंचशीला रवी जावळे आणि गंगाधर माधवराव खिलारे यांच्या विरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे आणि प्रतीक जगताप करत आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून बालविवाह रोखण्यासाठी कठोर भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.