भोसरीत पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू; चक्रपाणी वसाहतीतील घटना

पिंपरी – घराच्या अंगणात खेळत असताना पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून तीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १०) दुपारी अडीचच्या सुमारास चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे घडली. गणेश बालाजी मंजलवार (वय ३) असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजलवार कुटुंबीय भोसरी येथील चक्रपाणी वसाहतीमध्ये राहत आहेत. त्यांच्या घरासमोरील मोकळ्या मैदानात खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे.
दरम्यान, सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास चिमुरडा गणेश मित्रांसोबत अंगणात खेळत होता. त्यावेळी तोल गेल्याने गणेश खड्ड्यात पडला. गणेशसोबत खेळत असलेल्या मुलांनी त्याच्या आईला याबाबत माहिती दिली. आईने धावत जाऊन गणेशला खड्ड्याबाहेर काढले. गणेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.





