Child Abuse Case – आंब्याचे आमिष दाखवून ४७ वर्षीय व्यक्तीने अडीच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना सोमवारी (दि. १३) दुपारी एक वाजताच्या सुमारास काळेवाडी येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विजय भोसले (वय ४७, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या २८ वर्षीय आईने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काळेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी हे काळेवाडी येथील एका चाळीमध्ये राहतात. सोमवारी दुपारी आरोपीने फिर्यादी यांच्या अडीच वर्षीय मुलीला आंबे देण्याचे अमिष दाखवले. आंबे घेण्यासाठी त्याने मुलीला घरात बोलवले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान मुलगी मोठमोठ्याने ओरडली असता तिची आई आरोपीच्या घरात गेली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. मुलीला त्रास होत असल्याने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातून काळेवाडी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत. पोलिसांची तत्परता घटना उघडकीस आल्यानंतर आरोपी विजय भोसले हा घरातून पळून गेला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी त्वरीत तीन पथके तयार करून वेगवेगळ्या दिशेला पाठविली. अखेर भोसरी येथून त्याला अटक करण्यात आली. यामुळे पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आरोपीच्या विरोधात पोलिसांनी भक्कम पुरावा गोळा केला आहे. त्यामुळे त्याला नक्की शिक्षा लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.