Anil Chauhan : संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान उद्यापासून 7 मार्चपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या भेटीदरम्यान, ते ऑस्ट्रेलियन संरक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि ऑस्ट्रेलियन संरक्षण दलाच्या लष्करी नेतृत्वाशी विस्तृत चर्चा करतील. या मध्ये ऑस्ट्रेलियाचे संरक्षण दल प्रमुख जनरल ॲडमिरल डेव्हिड जॉन्स्टन,संरक्षण सचिव ग्रेग मोरियार्टी आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाच्या ऑपरेशनल कमांडच्या रचनेची माहिती घेण्यासाठी आणि संयुक्त कार्यवाहीसाठी संभाव्य मार्गांवर चर्चा करण्यासाठी सीडीएस फोर्स कमांड मुख्यालयाला भेट देतील.
जनरल चौहान ऑस्ट्रेलियन फ्लीट कमांडर आणि जॉइंट ऑपरेशन्स कमांडर यांच्याशीही संवाद साधतील. ते प्रतिष्ठित ऑस्ट्रेलियन डिफेन्स कॉलेजला भेट देणार आहेत. या भेटीत ते इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आव्हानांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित करतील. ऑस्ट्रेलियातील प्रमुख थिंक टँक अर्थात वैचारिक-बौद्धिक संस्था असलेल्या लोवी इन्स्टिट्यूटमध्ये सीडीएस एका गोलमेज चर्चेचे अध्यक्षस्थान भूषवतील.





