पुणे जिल्हा | सासवडमध्ये गुरूवारी मुख्यमंत्र्यांची सभा

सासवड, (प्रतिनिधी)- गेल्या २७ तारखेला मी महायुतीमध्ये समाविष्ट होण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुरंदर तालुक्यातील गुंजवणी व विमानतळाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे. जुन्या लेआउट प्रमाणे गुंजवणीचे काम पाच ते सहा महिन्यांमध्ये मार्गे लागणार आहे.
त्याचबरोबर दिवे येथे आयटी हब निर्माण करणे गरजेचे आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दि. ११ एप्रिल रोजी सासवड येथील पालखीतळावर सभा घेणार असल्याचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.
सासवड (ता. पुरंदर) येथे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली. शिवतारे म्हणाले, दिवे येथील ७५० एकर व चांबळी येथील ४०० एकरांवर आयटी हब निर्माण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर भोर येथील एमआयडीसीचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लागणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची लढाई ही महायुती विरुद्ध महा विकास आघाडी अशी आहे.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, माजी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रमेश इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उत्तम धुमाळ, बारामती पुरंदर लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष वामन जगताप, दिलीप यादव, अमित झेंडे, शरद जगताप, उपस्थित होते.
आज घटक पक्षांची बैठक
सोमवार (दि.८) रोजी सायंकाळी ४ वाजता विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.





